जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली
By Admin | Updated: May 21, 2017 00:28 IST2017-05-21T00:28:17+5:302017-05-21T00:28:17+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छतेने कहर केला आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली
कर्मचारी बेपत्ता : रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात अस्वच्छता
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छतेने कहर केला आहे. काही ठिकाणी लाखो रुपयांची यंत्रसामुग्री धूळ खात पडली आहे. कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची उपस्थिती नगण्य असते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली आहे.
‘लोकमत’ने संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विविध समस्या आढळून आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उदासिनता दिसून आली. त्याबरोबर शासनाचीही उदासिनता आहे. रुग्णालयांमध्ये लाखों रुपये किंमतीचे एक्स-रे मशीन अथवा तत्सम यंत्र बंद पडले तरी त्याची दुरुस्ती होत नाही. रुग्णालयांमध्ये औषधींचा तुटवडा आहे. शासकीय रुग्णालयातून रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगण्यात येते.
मूल तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील अर्धे कर्मचारी मुख्यालयी राहात नाहीत. गडचांदूरमध्ये केवळ दोन डॉक्टरवर ग्रामीण रूग्णालय सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सावली तालुक्यातही अनेक समस्या आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही.