लक्कडकोट परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली
By Admin | Updated: September 11, 2015 01:16 IST2015-09-11T01:16:09+5:302015-09-11T01:16:09+5:30
राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा परिसरात एक महिन्यापासून मलेरिया, डेंग्यूसदृष्य तापाची साथ सुरू आहे.

लक्कडकोट परिसरातील आरोग्य सेवा कोलमडली
राजुरा : राजुरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा परिसरात एक महिन्यापासून मलेरिया, डेंग्यूसदृष्य तापाची साथ सुरू आहे. मात्र रुग्णांना आरोग्य सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे आनंदगुडा येथील एका महिलेचा मृत्यू झाला व आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे आदिवासी व इतर शेकडो रुग्ण तापाच्या साथीने घरीच फणफणत आहे.
लक्कडकोट, घोटा, कोस्टाळा, आनंदगुडा हा परिसरात मलेरियाग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहे. हा परिसर तेलंगणा राज्याला लागून असल्यामुळे नेहमीच आजाराचे प्रमाण जास्त आहे. सदर गावे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येतो. परंतु तेथेसुद्धा एकच वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे येथील रुग्णाला योग्य उपचार मिळत नाहीत. लक्कडकोट येथे आरोग्य उपकेंद्र आहे. तेथे एकच परिचारिका असून तिच्याकडे सहा गावांचा प्र्रभार आहे. त्यामुळे आजारी लोकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
बुधवारी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली आनंदगुडा येथील महिला सुनिता रमेश कुळसंगे (३०) हिचा मृत्यू झाला. यापूर्वी घोटा येथील एका मुलीचा मृत्यू झाला होता. काही जागृत नागरिकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांना रुग्णांची संख्या वाढत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर घोटा येथील गंभीर आजारी भंगू भिमू कुमरे, सुरेश कुमरे, भागिरथा कुमाटे यांना तातडीने चंद्रपूर सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राजुरा ग्रामीण रुग्णालयात १० रुग्ण भरती आहे. तर शेख अयुब अनिल कोटावार व अन्य काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
लक्कडकोट परिसरात आदिवासीची संख्या जास्त आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे राजुरा, चंद्रपूर येथे जावून उपचार घेवू शकत नाही. त्यामुळे शेकडो रुग्ण घरीच ताफाने फणफणत आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास आरोग्याची स्थिती बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लक्कडकोट येथे आरोग्य शिबिर लावण्यात यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)