उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली
By Admin | Updated: July 4, 2015 01:44 IST2015-07-04T01:44:15+5:302015-07-04T01:44:15+5:30
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात १५ ते २० वर्षांपासून अत्यल्प मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारण नसताना कामावरून काढण्यात आले.

उपोषणकर्त्या महिलेची प्रकृती खालावली
आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उपोषण
ब्रह्मपुरी : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत ग्रामीण भागात १५ ते २० वर्षांपासून अत्यल्प मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारण नसताना कामावरून काढण्यात आले. याविरोधात कर्मचाऱ्यांनी येथील पंचायत समितीसमोर तीन दिवसांपुर्वी उपोषण सुरू केले. मात्र अद्यापही प्रशासनाने दखल न घेतल्याने शुक्रवारी उपोषणकर्त्या एका महिलेची प्रकृती खालावली असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुलभा तोंडरे, विद्या मैद, रविंद्र मैंद जि.प. शाळा बरडी तुन्ही, वासुदेव आदे जि.प. शाळा वायगाव, मीना मेश्राम, सेमु जराते जि.प. शाळा गोगाव, बिहारी हुमने वैनगंगा विद्यालय कोलारी या स्वयंपाकी व मदतनिस म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी करण्यात आले. कामावर घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या मुख्याध्यापक तसेच व्यवस्थापन समितीवर कारवाई करण्याकरिता आयटकचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, पुरुषोत्तम ढोरे, कुंदा कोहपरे यांच्या नेतृत्वात १ जुलैपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. सुलभा तोंडरे, विद्या मैंद, रवींद्र मैंद, वासुदेव आदे, मीना मेश्राम, सेमू जराते, बिहारी हुमने यांच्यापैकी सुलभा तोंडरे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)