प्रतिनियुक्तीच्या डॉक्टरांवर आरोग्य सेवेचा डोलारा
By Admin | Updated: August 24, 2016 00:23 IST2016-08-24T00:23:27+5:302016-08-24T00:23:27+5:30
जिल्हाभरात सध्या साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे.

प्रतिनियुक्तीच्या डॉक्टरांवर आरोग्य सेवेचा डोलारा
१२ पदे रिक्त : १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला
मंगेश भांडेकर चंद्रपूर
जिल्हाभरात सध्या साथीच्या आजाराचे थैमान सुरू आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांची गर्दी वाढत आहे. मात्र डॉक्टरांच्या अनुपस्थीतीने वेळेवर उपचार मिळत नसल्याची बोंब रूग्णांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त असून १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांच्या खांद्यावर सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधसाठा उपलब्ध नसल्याची बोंब सुरू आहे. मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आवश्यक सर्व औषधसाठा पुरविल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या सांगण्यानुसार औषधांचा प्रश्न मिटला असला तरी, आरोग्य केंद्रांत डॉक्टरच उपस्थित राहत नसल्याने उपचार मिळणे कठीण जात आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे, त्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दुसऱ्या ठिकाणी प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. एकाच डॉक्टरला दोन ठिकाणी कार्यरत राहून सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे नियुक्तीच्या मुळ ठिकाणी आरोग्य सेवा विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनियुक्तीसाठी २० वर्षापुर्वीच्या पत्राचा आधार घेतला जात असल्याने ही प्रतिनियुक्ती काहींना सोयीची तर काहींना गैरसोयीची ठरत आहे.
काही जण वरिष्ठांकडे सेटींग लावून प्रतिनियुक्ती करून घेत असल्याचाही प्रकार घडत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त असून ही पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहे. मात्र कित्येक वर्षांपासून ही पदे भरल्या न गेल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
अनाधिकृत गैरहजर डॉक्टरांवर
कारवाई व्हावी
पोंभुर्णा व कोरपना तालुक्यातील नारंडा व विरूर गाडेगाव येथील आरोग्य केंद्राचे डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून अनाधिकृत गैरहजर आहेत. तर इतरही ठिकाणचे डॉक्टर अनाधिकृत गैरहजर असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे विस्कळीत झालेली आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही एखाद्या आरोग्य केंद्रात नियुक्ती दिल्यास आरोग्य सेवा सुधारू शकतो.
प्रतिनियुक्तीवर असलेले डॉक्टर
फिरते आरोग्य पथक वणी (खु.) येथील डॉ. मेश्राम यांना चंदनखेडा आरोग्य केंद्रात प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. भारी फिरते आरोग्य पथकाचे डॉ. मानकर यांना मोहाळी नलेश्वर, मोखाळा फिरते पथकाचे डॉ. खोरडे यांना वरोरा तालुक्यातील सावरी, नवेगाव मोरे आरोग्य केंद्राचे डॉ. चिखलीकर यांना माढेळी, वासेराचे डॉ. चांदेकर यांना जिवती, आष्टा अॅलेपॅथिक दवाखान्याचे डॉ. मुंजनकर यांना मुधोली, टेमुर्डा येथील डॉ. भट्टाचार्य यांना कोसरसार, तोहोेगाव येथील डॉ. आसुटकर यांना पोंभुर्णा, धाबा येथील डॉ. लोणे यांना पोंभुर्णा, आर्युवेदीक दवाखाना पारडी येथील डॉ. कुरेशी यांना आरोग्य केंद्र मांडवा व कोळशी आर्युवेदीक दवाखाना, सावरगाव येथील अॅलोपॅथीक दवाखान्याच्या डॉ. सारिका राऊत यांना नवेगाव पांडव, बेंबाळ येथील आरोग्य केंद्राचे डॉ. निलंगेकर यांना नवेगाव मोरे व नवेगाव पांडव येथील डॉ. गेडाम यांना भिसी येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
पदव्युत्तर डॉक्टरांच्या
पगाराचा भार
सध्यास्थितीत जिल्ह्यातील १५ वैद्यकीय अधिकारी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेले आहेत. हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून या कालावधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पगार नियुक्त आरोग्य केंद्रातून जिल्हा परिषद आरोग्य विभाग काढत असते. या डॉक्टरांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ एखाद्या आरोग्य केंद्रातील रूग्णांना होणे आवश्यक आहे. मात्र सदर डॉक्टर जिल्हा सामान्य रूग्णालयात नियुक्ती मिळवून घेत असल्याने त्यांच्या पगाराचा भार जि.प. आरोग्य विभागाला सहन करावा लागत आहे.
आरोग्य सेवेचा समतोल राखण्यासाठी प्रतिनियुक्ती करणे आवश्यक असून त्यानुसारच डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.
- डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर.