मुख्याध्यापक जोमात, तर विद्यार्थी कोमात
By Admin | Updated: February 13, 2017 00:38 IST2017-02-13T00:38:28+5:302017-02-13T00:38:28+5:30
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे.

मुख्याध्यापक जोमात, तर विद्यार्थी कोमात
गोंडपिंपरी तालुक्यातील जि. प. शाळांतील प्रकार : मुख्याध्यापकांचा मनमानी कारभार
आकाश चौधरी गोंडपिपरी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आल्याची स्थिती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसून येत आहे.
शाळेच्या कार्यालयीन कामाच्या नावावर आपल्या वैयक्तिक कामासाठी मुख्याध्यापक पसार होत आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांकडे वर्ग असलेल्या मुलांची शैक्षणिक प्रगती अतिशय बिकट होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी कोमात दिसून येत असून मुख्याध्यापक मात्र आपआपली वैयक्तिक कामे करण्यासाठी जोमात दिसून येत आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांकडून असला प्रकार सुरू आहे. यामुळे पालकांमध्ये रोष पसरला आहे. गोंडपिपरी तालुक्यात ८५ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. यापैकी कित्येक शाळेतील मुख्याध्यापक ५० ते ६० किमी अंतरावरुन ये-जा करतात. यामुळे वैयक्तिक कामे करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. या वैयक्तीक कामावर मात करण्यासाठी अनेक मुख्याध्यापकांनी नवी शक्कल लढविली आहे.
मिटींग, लाईट बिल, प्रपत्र तर कधी आॅनलाईन माहितीचा बहाना सांगत हलचल रजिस्टरवर नोंद न करता घरी परस्पर पसार होत असतात. मिटींग अथवा काही कार्यालयीन काम असले तरी पहिले शाळेत येवून हलचल रजिस्टरवर नोंद करून कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणे व काम संपल्यावर शाळेत येवून पुन्हा हलचल रजिस्टरवर सह्या करणे अनिवार्य आहे. मात्र या नियमांना बगल देत कित्येक मुख्याध्यापकांनी शाळा बुडवून वैयक्तीक कामे करण्याची सवय लावल्याने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा बट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.
काही मुख्याध्यापकांनी तर चक्क आपल्याकडे असलेले विषय व इतर काही कामे दुसऱ्या शिक्षकांवर लादत आहेत. यामुळे त्या शिक्षकांवर अधिकचा भार पडत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाबत काही येत नसल्यास शिविगाळ करणे, धमकावणे असेही प्रकार सुरू आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
कार्यालयीन कामाच्या नावावर अनेक शाळेतील मुख्याध्यापक शाळेला बुट्ट्या मारून आपले वैयक्तिक कामे करताना पहायला मिळत आहे. या मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य अंधारात येण्याची वेळ ओढावली आहे. अशा मुख्याध्यापकांची चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- सुरेश चरडे, नगरसेवक, गोंडपिपरी
मुख्याध्यापकांनी कुठलेही कार्यालयीन काम असो, त्यांनी आपल्या शाळेतील सहकारी शिक्षकांना सांगून हलचल रजिस्टरवर नोंद करून जाणे आवश्यक आहे यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीला कळवणेही आवश्यक आहे. असले प्रकार सुरू असतील तर चौकशी करून दोषी मुख्याध्यापकांवर कार्यवाही करू.
- झावरू उराडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, गोंडपिपरी