लाचखोर आगार प्रमुख एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: February 28, 2015 01:18 IST2015-02-28T01:18:38+5:302015-02-28T01:18:38+5:30
निलंबित वाहकाला नोकरीवर पुन्हा रूजू करून घेण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी चंद्रपूर येथील आगार व्यवस्थापक राजीव राऊत याला शुक्रवारी ...

लाचखोर आगार प्रमुख एसीबीच्या जाळ्यात
चंद्रपूर : निलंबित वाहकाला नोकरीवर पुन्हा रूजू करून घेण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी चंद्रपूर येथील आगार व्यवस्थापक राजीव राऊत याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
२० नोव्हेंबर २०१४ रोजी तक्रारकर्त्या वाहकाच्या हातून तिकीटाचे जमा झालेले १७ हजार रूपये हरविले होते. त्या संदर्भात त्याने १२ फेब्रुवारी २०१४ ला वाहन निरीक्षकाकडे याबाबत माहिती देऊन पैसे भरून देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. परंतु, वाहन निरीक्षकाने तक्रारकर्त्या वाहकाचे काहीही ऐकून न घेता त्याच्या विरूद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर गुन्हा दाखल झाला.
दरम्यान आगार व्यवस्थापक राजीव राऊत यांनी त्याला निलंबीत केले. तीन महिने निलंबन कालावधी संपल्यानंतर वाहकाने राऊत यांच्याकडे नोकरीवर रूजू करून घेण्याची विनंती केली. मात्र राऊत यांनी त्याला यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितली.
ही लाच एसटी चालक मोतीसिंग चव्हाण याच्या मार्फत स्वीकारण्याची तयारी राऊत यांनी दाखविली. मात्र, ऐनवेळी दोघांनीही लाच घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, घडलेला प्रकार हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमात मोडत असल्याने एसीबीने त्यांना अटक केली. (स्थानिक प्रतिनिधी)