मागेल त्याला शेततळे योजनेला थंड प्रतिसाद
By Admin | Updated: May 17, 2016 00:39 IST2016-05-17T00:39:08+5:302016-05-17T00:39:08+5:30
मोठा गाजावाजा करुन राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली असली तरी...

मागेल त्याला शेततळे योजनेला थंड प्रतिसाद
केवळ १४४ अर्ज : एकाही शेततळ्याला सुरूवात नाही
नागभीड : मोठा गाजावाजा करुन राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू करण्यात आली असली तरी नागभीड तालुक्यात या योजनेला अतिशय थंड प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अगोदर शेततळे तयार करावे हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे बोलल्या जात आहे.
दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. अगदी एका पावसाने शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशावेळी हे शेततळे शेतकऱ्यांच्या मदतीला यावेत. तसेच पावसाचे पाणी जागीच मुरावे या हेतुने ही योजना सुरू करण्यात आली असली तरी आर्थिकदृष्टया हतबल असलेले या तालुक्यातील शेतकरी या योजनेस प्रतिसाद देण्याच्या मन:स्थितीत नाहीत असेच एकंदर चित्र आहे.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार योजना सुरू होऊन बरेच दिवस झाले असले आणि या योजनेचा बराच गाजावाजा झाला असला तरी नागभीड तालुक्यात आतापर्यंत केवळ १४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या १४४ अर्जापैकी ११९ अर्जांनी मंजुरी देण्यात आली आहे. सर्व शेतकऱ्यांची कार्यशाळा आयोजित करुन शेततळ्याचे काम सुरू करावे, अशा सुचनासुद्धा येथील कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत. असे असले तरी आजतागायत एकाही शेतकऱ्यांने शेततळ्याच्या कामास सुरूवात केली नसल्याचे माहितीगाराकडून समजले.
या १५ बाय १५ बाय ३ शेतळ्यावर २२ हजार ११०, २० बाय १५ बाय ३ शेततळ्यावर २९ हजार ७०६, २० बाय २० बाय ३ शेततळ्यावर ४० हजार ४७६, २५ बाय २० बाय ३ शेततळ्यावर अगोदर हा पैसा स्वत: खर्च करावयाचा आहे. काम झाल्यानंतर या कामाची तपासणी संबंधित विभाग करेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल, असे या योजनेत प्रावधान आहे.
सध्यास्थितीत या तालुक्यातील शेतकरी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. तोंडावर आलेला हंगाम कसा करायचा ही चिंता त्यांचेसमोर आ वासून उभी आहे.
दरवर्षी निसर्ग दगा देत असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडून त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अश्या स्थितीत शेततळ्यावर तो कुठून आणि कसे खर्च करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)