निर्बंधाचे उल्लंघन केल्याने ठोठावला पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:30 IST2021-04-09T04:30:50+5:302021-04-09T04:30:50+5:30
चंद्रपूर : शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग ...

निर्बंधाचे उल्लंघन केल्याने ठोठावला पाच हजारांचा दंड
चंद्रपूर : शासनाने लागू केलेल्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर मनपा प्रशासनाने गुरूवारी प्रत्येकी ५००० हजारांचा दंड ठोठावला तर हल्दीराम रेस्टारंटला पाच दिवस बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे.
मनपा पथकामार्फत झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी करताना उत्सव लॉन येथे विवाह सोहळा सुरू असल्याचे आढळून आले. विवाहासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्ती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लॉन मालकाला दंड ठोठावण्यात आला. हल्दीराम रेस्टारंटचे काही कर्मचारी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले होते. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाने इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या.
मात्र, चाचणी न करताच कर्मचारी कर्तव्यावर आढळले. त्यामुळे व्यवस्थापकांवर पाच हजारांचा दंड आणि पाच दिवस रेस्टारंट बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली. शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश असताना इन्स्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस चालकांनी शिकवणी वर्ग सुरू ठेवले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे शिकवणी वर्ग संचालकांकडून पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सहायक आयुक्त शीतल वाकडे, विद्या पाटील, डॉ. अश्विनी भारत, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, प्रदीप मडावी, महेंद्र हजारे आदींनी केली. कोरोना बाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होताना दिसत असून कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष अपेक्षित नाही असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापुढे दंड ठोकून सील करणार
लसीकरण आणि नियमांतील शिथिलतेमुळे काही नागरिक कोरोनाबाबत बेफिकिर झाले. कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. मात्र, यापुढे असा प्रकार घडल्यास मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठावून सील करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी पथकाला दिले.