तो येतो, सावज टिपतो आणि निघून जातो
By Admin | Updated: February 5, 2016 00:46 IST2016-02-05T00:46:15+5:302016-02-05T00:46:15+5:30
तो येतो सावज टिपतो आणि निघून जातो. त्याचा हा क्रम गेल्या एक-दीड महिन्यापासून सारखा सुरू असला तरी त्याच्या या कारवायांची अद्याप कोणी तक्रार केली नाही.

तो येतो, सावज टिपतो आणि निघून जातो
घनश्याम नवघडे नागभीड
तो येतो सावज टिपतो आणि निघून जातो. त्याचा हा क्रम गेल्या एक-दीड महिन्यापासून सारखा सुरू असला तरी त्याच्या या कारवायांची अद्याप कोणी तक्रार केली नाही. मात्र सारेच त्याच्या दहशतीत वावरत आहेत.
नागभीड तालुक्यातील देवपायली येथे एका बिबट्याने मांडलेल्या थराराची कथा आहे. सदर प्रतिनिधीने देवपायली येथे नुकतीच भेट दिली असता गावकरी आपली व्यथा लोकमत जवळ व्यक्त करीत होते. नागभीडपासून १७-१८ किमी अंतरावर हे गाव असून गावाच्या भोवती जंगल आहे. शेती आणि पशुपालन येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मोहफूल आणि तेंदूचा हंगामही त्यांना हातभार लावत असतो.
या गावात एका बिबट्याने गेल्या एक-दीड महिन्यापासून चांगलाच थरार चालविला आहे. रोज रात्री गावात येतो आणि एक बकरी किंवा बकरा उचलून घेऊन जातो. अगोदर गवकऱ्यांनी बिबट्याच्या या कारवायांकडे दुर्लक्ष केले. पण हा प्रकार वाढतच राहिला. रोज एका नवीन बकऱ्याची शिकार हा बिबट करु लागला. त्यामुळे गावकऱ्यांनी आपल्या बकऱ्या कडेकोट बंदोबस्तात ठेवणे सुरू केले. पण तो यावरही कधी कधी मात करतो.
यानंतर या बिबट्याने आपला मोर्चा कोंबड्यांकडे वळविला. कधी कोंबड्या तर कधी बकऱ्यावर त्याचे ताव मारणे सुरुच आहे. एक दिवस तर या बिबट्याने कमालच केली. एका घरचा चक्क कुत्राच तो घेवून गेला. आता या बिबट्याची गावात चांगलीच दहशत पसरली आहे. रात्री आठ वाजतानंतर या गावात अघोषित संचारबंदीचे दृश्य निर्माण होते. हे गाव नागभीड तालुक्यात असले तरी तळोधी (बाळापूर) वनपरिक्षेत्रात हे गाव आहे. गावात या बिबट्याने एवढा थरार चालविला असला तरी कोणीही यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार नोंदविली नाही, हे विशेष ! या बिबट्याचा थरार एवढ्यावरच थांबत नाही. कधी कधी दिवसाढवळ्यासुद्धा त्याचे दर्शन घडते, अशी माहिती देवपायलीचे माजी सरपंच लक्ष्मण कोहपरे यांनी दिली. शेतशिवारातील कामे गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच करावी लागत आहेत.