शाळेतील संस्कार त्याने आचरणात आणले
By Admin | Updated: February 13, 2016 00:40 IST2016-02-13T00:40:10+5:302016-02-13T00:40:10+5:30
शाळेत मिळणाऱ्या संस्काराला पर्याय नाही असे म्हणतात. या संस्काराची प्रचिती ‘प्रसाद’ने आपल्या आचरणातून आणून दिले ...

शाळेतील संस्कार त्याने आचरणात आणले
चंद्रपूर : शाळेत मिळणाऱ्या संस्काराला पर्याय नाही असे म्हणतात. या संस्काराची प्रचिती ‘प्रसाद’ने आपल्या आचरणातून आणून दिले आणि एका पक्ष्याचे जीव वाचविले. प्रसादच्या या कार्याची गावात प्रशंसा होत आहे.
‘त्या’ दिवशी नागभीडच्या सरस्वती ज्ञान मंदिर विद्यालयात ‘झेप’ या निसर्ग संस्थेने शाळेच्या आणि संस्थेच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून पक्षी, साप, कीटक या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या शाळेचा विद्यार्थी प्रसाद नवघडे याने हे मार्गदर्शन मनापासून ऐकले आणि तो घरी आला. जेवण वगैरे आटोपून तो कॉलरीला लागून असलेल्या क्षेत्रात नेहमीप्रमाणे गेला. यावेळी शेतातील एका बांधात एक पक्षी अतिशय रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत असल्याचे त्याला दिसून आले. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याने आपल्या अंगातील टी शर्ट काढली आणि जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या त्या पक्षाला टी शर्टमध्ये गुंडाळले आणि त्याला घेऊन तो घरी आला व आपल्या बालबुद्धीप्रमाणे त्या पक्ष्यास पाणी पाजून दाणे दिले. त्यानंतर त्याने वडिलांना फोन करुन याची माहिती दिली. वडिलांनी लगेच झेपच्या कार्यकर्त्यांना या पक्ष्याबद्दल माहिती दिली.
या माहितीनुसार झेपचे पवन नागरे, अमित देशमुख, समीर भोयर यांनी प्रसादच्या घरी येवून अतुल येरमे यांच्या मार्फत या जखमी पक्ष्यावर उपचार प्राथमिक उपचार करुन घेतले. जखम मोठी असल्याने या पक्ष्यास नंतर नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले. प्रसादने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल सरस्वती ज्ञान मंदिरचे अध्यक्ष संजय गजपुरे, मुख्याध्यापक गोकुळ पानसे, पराग भानारकर आशिष गोंडाणे, सतीश जीवतोडे, पंकज दरवरे यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)