‘तो’ अवलिया बुजवतोय रस्त्यावरील खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:11 IST2021-01-13T05:11:24+5:302021-01-13T05:11:24+5:30
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरात मुख्य रस्त्यावर मोठे व जीवघेणे खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या खड्डयांमुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. ...

‘तो’ अवलिया बुजवतोय रस्त्यावरील खड्डे
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरात मुख्य रस्त्यावर मोठे व जीवघेणे खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत. या खड्डयांमुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. हे खड्डे पाहवत नसल्याने बाबूपेठ परिसरातील सुधाकर साखरकर या ७७ वर्षीय अवलिया मागील एका वर्षापासून कुदळ व फावडा घेऊन परिसरातील खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. त्यांचे काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
चंद्रपूर शहरात अमृत योजनेंतर्गत भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ता फोडूून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. बाबूपेठ परिसरातील मुख्य रस्त्यावर जीवघेणे खड्डे होते. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघात घडून जीवितहानी झाली. बाबूपेठ उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तेथेसुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. बाबूपेठ परिसरातील रस्ते व रस्त्यावरील खड्डे पाहून सुधाकर साखरकर यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी लागलीच खड्डे बुजविण्याचा निर्णय घेऊन कुदळ व फावडा हातात घेतले. साखरकर यांच्या खड्डे बुजविण्याच्या कामाला घरातून विरोध झाला. पत्नी, मुलगा, नातवंड यांनी विरोध करून खड्डे बुजविण्याची काही गरज नाही, तुम्ही आता आराम करा, असे सांगितले. मात्र, त्यांनी कुणाचेही न ऐकता एकटेच हातात कुदळ व फावडा घेऊन आजूबाजूला असलेली रेती, गिट्टी व माती एका चुगडीत भरून खड्डा असलेल्या ठिकाणी नेऊन टाकतात. मागील एका वर्षापासून ते रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत बाबूपेठ परिसरातील रेल्वे गेटपासून ते नेताजी चौकपर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, भिवापूर व बाबूपेठ परिसरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविले आहेत. या कामाच्या मोबदल्यात कोणतीही अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाही. वयाच्या ७७ व्या वर्षी देखील खड्डे बुजविण्याचे काम करीत आहे. त्यांचे खड्डे बुजविण्याचे काम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.