घर नसल्याने दोन चिमुकल्यांसह झाडाखाली विसावा
By Admin | Updated: April 27, 2015 01:04 IST2015-04-27T01:04:31+5:302015-04-27T01:04:31+5:30
सन २००२ मध्ये झालेल्या बीपीएल सर्वेक्षणात सर्व्हेक्षण करणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीच्या चुकामुळे पिंपळगाव (भो) येथील अनेक धनाढ्यांचा बीपीएल यादीत समावेश करण्यात आला.

घर नसल्याने दोन चिमुकल्यांसह झाडाखाली विसावा
पिंपळगाव (भो) : सन २००२ मध्ये झालेल्या बीपीएल सर्वेक्षणात सर्व्हेक्षण करणाऱ्या शासनाच्या प्रतिनिधीच्या चुकामुळे पिंपळगाव (भो) येथील अनेक धनाढ्यांचा बीपीएल यादीत समावेश करण्यात आला. या योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांना हेतुपुरस्सर डावलण्यात आले. त्यातील नीळकंठ टिकले या भूमिहीन मजुराला नावापुरती झोपडी आहे. परंतु त्यात गुजरान होत नसल्याने दोन चिमुकल्यासह झाडाखाली विसावा घ्यावा लागत आहे.
नीळकंठ टिकले हा रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे. बीपीएलचे सर्वेक्षण करताना शासकीय प्रतिनिधीच्या चुकीमुळे त्याचे नाव बीपीएलच्या यादीतून गळाले. त्यामुळे त्याच्यावर घरकूल योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. वास्तव्यासाठी त्याने एक झोपडी बांधली आहे. परंतु या लहानशा झोपडीत राहणे त्याला कठिण झाले आहे. उन्ह, वादळ, वाऱ्यात कुटुंबाला कुठे ठेवावे या चिंतेने त्याला ग्रासले आहे. या घरकूल योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त होत असून सर्वेक्षणाच्या चौकशीची मागणी होत आहे. शासनाने आपल्या प्रतिनिधीसह गावातील पाच नागरिकांच्या सहभागात पथक तयार करावे व या पथकाद्वारे पुन्हा एकदा सर्वेक्षण करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)