हवालदिल शेतकरी झिजवतो बँकांचे उंबरठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:22 IST2018-01-29T23:22:02+5:302018-01-29T23:22:24+5:30

हवालदिल शेतकरी झिजवतो बँकांचे उंबरठे
विनेशचंद्र मांडवकर।
आॅनलाईन लोकमत
नंदोरी : अस्मानी व सुलतानी संकटात बळीराजा पूर्णत: होरपळून निघाला. बोंडअळीचे सावट विदर्भासह संबध महाराष्ट्रातही पसरले. कृषी अधिकारी व तत्सम संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्ण गुण देऊन बियाणे पास केले. कपाशीचे पीक निम्यापेक्षाही कमी आले. आधीच परिस्थितीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांचा यात बळी गेला. आज ग्रामीण शेतकरी कर्जमाफीचे पैसे आलेत का, हे विचारत तलाठी कार्यालय व बँकांचे उंबरठे झिजवत आहे.
चालू कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के कसाबसा लाभ मिळाला असल्याचे बँक अधिकारी सांगतात. थकबाकीदार व परिस्थितीने नडलेला शेतकरी मात्र आजही डोळ्यात प्राण आणून कर्जमुक्तीची वाट बघत आहे. पुढील हंगामात बियाणांकरिता पैशाची व्यवस्था कशी करावी, मुलीचे लग्न कसे करावे, पोरांची शाळा-कॉलेज शुल्क कसे भरावे, या विवंचनेत आहे.
जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आजही दु:खाचे सावट पसरले आहे. बीजी-२, नंतर बीजी-३ आली. बोंडअळीस प्रतिकारक म्हणून बीजी-२ या कपाशीच्या बियाण्यांचा गाजावाजा झाला. तणसमारक म्हणून बीजी-३ या कपाशीला शेतकºयांनी डोक्यावर घेतले.
बीजी-३ व बीजी-२ बोंडअळ्यांनी पोखरून टाकली. कंपन्या व अधिकारी मात्र गलेलठ्ठ झाले. एकीकडे शेतकऱ्यांचा उध्दारकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांनी गाजावाजा केला. आज शेतकरी त्याची नुकसान भरपाई मागत आहे. तरीही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी कृषिपंपांकरिता बँकांकडे अर्ज केल्यास या प्रक्रियेत थकीत पीक कर्ज आड येत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
लाख मोलाचे पीक गेले. रोगप्रतिकारक म्हणून बीजी-२ कपाशी लावली. ती बोंडअळ्यांनी फस्त केली. शासनाने बोगस बियाणे पास केले. कंपन्या व संबंधित अधिकारी याला जबाबदार आहेत. आम्हाला बोगस बियाण्यांची नुकसान भरपाई द्यावी व डोक्यावरील कर्ज मुक्त करावे. तसेच हमीभावाने तूर खरेदी करावी व खरेदी केंद्र सुरू करावे.
- वसंत जिवतोडे, जेष्ठ कार्यकर्ता, शेतकरी संघटना.