मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी

By Admin | Updated: March 6, 2016 00:38 IST2016-03-06T00:38:25+5:302016-03-06T00:38:25+5:30

येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना टोपी घालणाऱ्या ठगसेनास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

Hats to unemployed by pretending to work in the ment | मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी

मनपात नोकरी लावून देण्याची बतावणी करून बेरोजगारांना टोपी

एकाला अटक : आयुक्तांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार
चंद्रपूर : येथील महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना टोपी घालणाऱ्या ठगसेनास शहर पोलिसांनी अटक केली आहे. यात आणखी काही जण गुंतल्याची शक्यता असल्याच्या संशयावरून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
महानगरपालिकेत क्लर्क आणि चपराशीपदासाठी नोकरभरती सुरू असल्याचे सांगत या पदावर भरती करण्यासाठी युवकांकडून पैसे घेऊन बनावट नियुक्तीपत्र देणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते ताजुद्दीन शेख यांना मिळाली. काही युवक त्यांच्याकडे आले. त्यांनी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेत चौकशी केली. परंतु अशी कोणतीही भरती प्रक्रिया महानगरपालिकेत सुरू नसल्याची माहिती त्यांना महानगरपालिकेतून मिळाली. लगेच ताजुद्दीन शेख यांनी महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. या प्रकाराने आयुक्तसुद्धा अचंबित झाले. त्यांनी लगेच शहर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच तक्रारीची दखल घेत तिघांना ताब्यात घेतले. मात्र त्यातील दोघे हे या ठगसेनाकडे पैसे परत मागण्यासाठी आले होते, असे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
या युवकाकडे बनावट नियुक्तीपत्राचे काही दस्ताऐवज आढळले असून त्यातील मजकूर किंवा भरती प्रक्रिया यासंबंधी महानगरपालिकेचा कोणताही संबंध नसल्याचे आयुक्तांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या तक्रारीतून केली होती. काही पीडित युवकांनी फसवणूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पीडित युवकांच्या तक्रारीवरुन तीन संशयितांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
फरार आरोपी भानापेठ येथील असून त्याची स्वत:ची प्रिटिंग प्रेस असल्याचे सांगण्यात येते. मनपात आपली सेटिंग असून नोकरीची खात्री पक्की, असे आश्वासन देऊन तो युवकांना गळाला लावत होता. क्लर्क पदासाठी तीन लाख तर चपराशीपदासाठी दोन लाख रुपये ही टोळी घेत होती. मात्र आतापर्यंत त्यांनी किती युवकांकडून पैसे घेतले, हे स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)
दारु तस्कराला पकडले
चौगान : बेटाळा फाटा ते चौगान मार्गाने सायकलने दारूची तस्करी करणाऱ्या प्रभाकर तुळशीराम भोयर (रा. चौगान) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून देशी दारूच्या २० बॉटल जप्त करण्यात आल्यात. चौगान येथील पोलीस पाटील किशोर तिडके, पोलीस मित्र धनपाल बुरांडे, विनोद बुराडे, शरद मैद यांनी दारु पकडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. ही कारवाई ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार लक्ष्मण मडावी यांनी केली. (वार्ताहर)

Web Title: Hats to unemployed by pretending to work in the ment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.