ग्रामीण भागातील तळीरामांना व खवय्यांना सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:55+5:302021-01-14T04:22:55+5:30

ब्रह्मपुरी : गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका आल्या की, उमेदवारांना मतदारांना खूश करण्याकरिता नानाविध प्रलोभन देऊन आकर्षित केले जाते. हे ...

Harvest day for Taliram and khawais in rural areas | ग्रामीण भागातील तळीरामांना व खवय्यांना सुगीचे दिवस

ग्रामीण भागातील तळीरामांना व खवय्यांना सुगीचे दिवस

ब्रह्मपुरी : गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या निवडणुका आल्या की, उमेदवारांना मतदारांना खूश करण्याकरिता नानाविध प्रलोभन देऊन आकर्षित केले जाते. हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात होऊ घातलेल्या ६८ ग्रामपंचायतींमधील तळीरामांना सुगीचे दिवस आले असून, खवय्यांचीही चांदी होत आहे.

सध्याच्या परिस्थितीत दारूशिवाय निवडणूक ही अशक्य बाब बनली आहे. दिवसभर शांत असणारा तळीराम सायंकाळी मात्र जागा होतो. आपली दारूची तल्लफ पूर्ण करण्यासाठी खुलेआम उमेदवारांकडे दारूची मागणी करतो. उमेदवारालाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही नाराज करता येत नाही. त्यामुळे त्यांनाही नाइलाजाने तळीरामांना जपावे लागते. ग्रामीण भागातील गावगाड्यात फेरफटका मारल्यास दारूबंदी असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यात अगदी सहज दारू मिळते, त्यावरून ग्रामपंचायत निवडणुकीत दारूचा महापूर येण्याची शक्यता नाकारत येत नाही.

ज्या गावात निवडणूक त्या गावातील तळीराम खूश, असे चित्र सध्या तालुक्यात पहायला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक उमेदवाराला मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू पाजण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मतदारांना खूश ठेवण्यासाठी कोणताही उमेदवार कसलीही कसर ठेवत नाही. त्यामुळे तालुक्यातील तळीरामांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गावागावात जेवणाच्या पंगती उठत आहेत. तालुक्यात येत्या १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान होणार आहे. त्यासाठी बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. फक्त दोनच दिवस शिल्लक असून, तालुक्यातील गावागावातील प्रचार शिगेला पोहोचला आहे.

त्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा मी कसा चांगला आहे, निवडून आल्यानंतर गावाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन, हे पटवून देण्यात व्यस्त आहे. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवार नवनवीन क्लुप्त्या वापरत आहेत. त्यातीलच महत्त्वाचे म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रलोभने दाखवून आकर्षित केले जात आहे.

Web Title: Harvest day for Taliram and khawais in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.