दुकान गाळ्यांसाठी मनपा आयुक्तांना साकडे
By Admin | Updated: September 9, 2016 00:52 IST2016-09-09T00:52:44+5:302016-09-09T00:52:44+5:30
स्थानिक नेहरु मार्केट सराई वार्ड येथे तत्कालीन चंद्रपूर नगर परिषदेने बांधलेले मार्केट गाळे जीर्णावस्थेत असून या

दुकान गाळ्यांसाठी मनपा आयुक्तांना साकडे
चंद्रपुरातील नेहरू मार्केट : पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी
चंद्रपूर : स्थानिक नेहरु मार्केट सराई वार्ड येथे तत्कालीन चंद्रपूर नगर परिषदेने बांधलेले मार्केट गाळे जीर्णावस्थेत असून या मार्केटला ३० ते ३२ वर्षे झाले आहेत. या मार्केट मध्ये वर्तमान चंद्रपूर महानगरपालिकातर्फे नवीन गाळे बांधकाम करायचे असल्याने येथील दुकानदारांना दुकाने खाली करण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे. यावर दुकानदारांनी आक्षेप घेवून दुकानांसाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी मनपा आयुक्तांना निवेदनातून केली आहे.
येथील गाळे ८ बाय ६ चौ. फुटाचे गाळे फुटपाथवरील दुकाने हटवून १९८४- ८५ ला अनामत रक्कम न घेता कमी भाड्यात देण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षानंतरच हे मार्केट फेल ठरले व येथे १२० दुकानामधून फक्त ४० दुकाने सध्या सुरू आहेत. ज्यांना ही दुकाने मिळालीत त्यांनी, तर येथे दुकान सुद्धा टाकले नाही. येथे बेरोजगार युवक लहान-लहान व्यवसाय करीत आहेत. पानठेला, सायकल स्टोअर्स, टेलर, पेंटर, स्प्रे सेंटर, सलून, झेरॉक्स, रबर स्टॅम्प, फोटो शॉप असे लहान व्यापारी येथे असून यांना दुकान हटविण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेहरू मार्केट दुकानदार असोसिएशनतर्फे उपायुक्त इंगोले यांना निवेदन दिले व चर्चा केली. आर्किटेक्सशी चर्चा करून सध्या बाजुचे गोडावून तोडून पहिल्यांदा तेथे गाळे बांधून सध्या येथे दुकान चालविणाऱ्यांना दुकाने दिल्यानंतरच दुकाने खाली करून तोडण्यात येईल, असे आश्वासन उपआयुक्तांनी दिले.
निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अ. खालीक, सचिव प्रदीप नालमवार, सदस्य रकीब शेख, वासुदेव कडवे, मारोती ठाकरे, अजय सुत्रावे, सैय्यद रईस, बाबा खान, अ. रज्जाक अजीम शेख आदी उपस्थित होते. जीर्ण गाळे पाडण्याआधी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यास अनेक व्यवसायिकांना सोयीचे होणार आहे. यासाठी पालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)