ताडोबा मार्गाच्या मध्यभागी पडलेले भगदाड धोक्याचा
By Admin | Updated: July 14, 2017 00:26 IST2017-07-14T00:26:56+5:302017-07-14T00:26:56+5:30
पद्मापूरच्या मोरघाट नाल्यापासून वळविण्यात आलेल्या ताडोबा मार्गाच्या मध्यभागी एक भगदाड पडले आहे.

ताडोबा मार्गाच्या मध्यभागी पडलेले भगदाड धोक्याचा
अपघाताची शक्यता : लक्ष देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
दुर्गापूर : पद्मापूरच्या मोरघाट नाल्यापासून वळविण्यात आलेल्या ताडोबा मार्गाच्या मध्यभागी एक भगदाड पडले आहे. त्यामुळे येथे केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नुकतेच केलेल्या या मार्गाच्या दुरवस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पद्मापूर मोरघाट नाल्याच्या उजव्या बाजूने पूर्वी ताडोबाकडे जाण्याचा मार्ग होता. सेक्टर चार खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता हा मार्ग वळविण्यात आला. या मार्गाचे दोन-तीन वर्षाआधी बांधकाम झाले आहे. पद्मापूर कोळसा खाणीच्या कोल स्टॉकपासून पुढे गेल्यावर या मार्गाच्या अगदी मध्यभागी एक घातक खोलगट भगदाड पडले आहे. याचे स्वरूप छोटे असले तरीही त्या भोवतालचा भाग कमकुवत झाला आहे. त्यामुळे तो हळूहळू गंभीर रुप धारण करीत आहे. याशिवाय या मार्गावर या भगदाडापासून काही अंतरापर्यंत आतून भेगा पडल्याची एक खून उमटून दिसत आहे.
या रस्त्यावरील डांबराचे आवरण फाटून येथे मोठी भेग पडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास येथे गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. या मार्गाचे नुकतेच बांधकाम करण्यात आले आहे. याच मार्गावर परत एका ठिकाणी कालवट जवळ मोठे भगदाड पडले आहे. नवीन मार्गाची अशी दुरवस्था होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून तत्काळ या मार्गाच्या दुरवस्थेची कारणमीमांसा तपासून वेळीच या मार्गाची योग्य पद्धतीने दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.