सिमेंट मिक्सरमध्ये हात अडकलेल्या कामगाराची दीड तास मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: December 6, 2015 00:48 IST2015-12-06T00:48:42+5:302015-12-06T00:48:42+5:30
वरोरा नाकाजवळील आयटीआयच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामावर असलेल्या गोपाल काशिनाथ निकोडे या मजुराने मृत्यूचा थरार अनुभवला.

सिमेंट मिक्सरमध्ये हात अडकलेल्या कामगाराची दीड तास मृत्यूशी झुंज
कटरने मशीन कापून सुटका : भररस्त्यावर सुरु होता जीवघेणा थरार
चंद्रपूर : वरोरा नाकाजवळील आयटीआयच्या सुरक्षा भिंतीच्या बांधकामावर असलेल्या गोपाल काशिनाथ निकोडे या मजुराने मृत्यूचा थरार अनुभवला. सिमेंट मसाला मिसळणाऱ्या मिक्सर मशीनमध्ये त्याचा हात कोपरापर्यंत अडकला. तब्बल दीड तास तो अडकलेल्या अवस्थेत मृत्यूशी झुंज देत होता. अखेर कटर मशीनने हे मिक्सर कापून त्याचा हात मोकळा करण्यात आला.
वरोरा-चंद्रपूर मार्गावर शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काम करीत असताना गोपाल निकोडे (रा. सुशी दाबगाव, ता. मूल) २३ वर्षीय मजुराचा हात अचानकपणे फिरत्या चाकात गेला. तो पुढे ओढत जाऊन अगदी ढोपरापर्यंत तो ओढला गेला. हे लक्षात येताच मशीन बंद करण्यात आली. त्यामुळे सुदैवाने तो बचावला. हात सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात तो पुन्हा आत ओढला जात होता. तब्बल दीड तास तो वेदनेने विव्हळत अडकून होता. हा प्रकार लक्षात आल्यावर आयटीआयमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कटर मशीन आणून मिक्सर कापण्यात आले. त्यासाठी बराच वेळ खर्ची गेला. वाहतूक पोलीस आणि रामनगरचे पोलीसही पोहोचले. त्यांनीही मदत करून मिक्सरमधील मसाला रिकामा केला.
अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर मशीन कापण्यात यश आल्यावर त्याची सुटका झाली. वाहतूक पोलिसांनी आपल्या कर्तव्यतत्परतेचा परिचय दिला. वाहतूक पोलीस निरीक्षक कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रामनगर पोलिसांच्या शिपायांनीही मदतकार्यात भाग घेतला. त्यानंतर काळी यांनी स्ववाहनाने जखमी मजुराला रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. (जिल्हा प्रतिनिधी)