साडेपाच वर्षीय शिशिरने मोडला रेकॉर्ड
By Admin | Updated: December 30, 2016 01:31 IST2016-12-30T01:31:24+5:302016-12-30T01:31:24+5:30
जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची पायमुळं खोलवर रुजली जावी, यासाठी मागील वर्षीही प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून वा प्रशासनाकडून करण्यात आली नाही.

साडेपाच वर्षीय शिशिरने मोडला रेकॉर्ड
चंद्रपूर : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीची पायमुळं खोलवर रुजली जावी, यासाठी मागील वर्षीही प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून वा प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे मागील वर्षी क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यात फारसा ठसा उमटू शकला नाही. मात्र साडेपाच वर्षीय शिशिर सुभाष कामडी या बालकाने स्केटींगमध्ये नवा विक्रमाची नोंद केली. त्याने इंडिया बुक आॅफ रेकॉर्डचाच आजवरचा रेकॉर्ड मोडीत काढला. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यासाठी ही भुषणावह बाब ठरली.
क्रीडा क्षेत्रातील ही मोठी झेप सोडली तर उर्वरित वर्षभर तालुका, जिल्हा व विभागीय व राज्यस्तरवरील क्रीडा स्पर्धा होत राहिल्या. २ जानेवारीला सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर बॉस्केटबाल असोसिएशनच्या वतीने ब्रह्मपुरी येथे राज्यस्तरीय बॉस्केटबाल स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात नांदेडने नागपूरच्या चमूवर एका गोलने मात केली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे यंदाही ६ फेब्रुवारीला नागपूर विभागीय महसूल क्रीडा स्पर्धाचे जिल्हा क्रीडा संकुलाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूर विभागातील संपूर्ण टिम सहभागी झाल्या होत्या.
भद्रावती नगरपालिकेच्या वतीने १२ ते १४ मार्च यादरम्यान नागपूर विभाग नगराध्यक्ष चषक व राज्यस्तरीय बॉक्सींग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेने सहभागी स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन करून भद्रावतीकरांना रिझविले होते. ५ एप्रिल रोजी आयुधनिर्माणी चांदा येथे रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा पार पडल्या होत्या. क्रिकेटमधील होतकरू खेळाडूंसाठी मागील वर्षी चांगली पर्वणी चालून आली होती. १४ ते १९ वयोगटातील मुलांसाठी क्रिकेट प्रशिक्षण निवड चाचणी २९ एप्रिलला घेण्यात आली. यातून चांगले क्रिकेटपटू निवडण्यात आले. पुढे त्यांना विभागीय व राज्यस्तरावर खेळविण्यात येणार होते. २० मे रोजी बल्लारपूर येथे आयोजित कराटे स्पर्धा चांगलीच चर्चेची राहिली. या आॅल इंडिया ओपन कराटे कुंग फू चॅम्पीयनशिपच्या नागपूर येथील किर्ती राऊत आणि पुरुषामध्ये वर्धा येथील सोयल बेग हे विजयी ठरले. २५ मे रोजी अकोला येथे विदर्भस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत चंद्रपुरातील खेळाडूंनी तब्बल ३५ पदके प्राप्त केली. खेळाडूंचे हे यश मागील वर्षीचा लक्षणीय ठेवा ठरला.
२ आॅगस्टला क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये पार पडली. २२ आॅगस्टला चंद्रपुरातील शिशिर सुभाष कामडी या साडेपाच वर्षांच्या मुलाने इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये स्केटींग प्रकारात नवा विक्रम नोंदविला. ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय व्हालीबाल स्पर्धा पार पडली. यात बल्लारपूर नगरपालिकेच्या गांधी विद्यालयाची चमू उपविजेती ठरली. येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
मॅराथान स्पर्धा ठरली लक्षवेधक
आनंदवनातील ज्येष्ठ समाजसेवक कर्मयोगी स्व. बाबा आमटे यांच्या स्मृतीनिमित्त १० फेब्रुवारीला वरोरा येथे ‘भारत जोडो मॅराथान स्पर्धा’ घेण्यात आली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेत प्रथमच अपंग, अंध, मुकबधिर असे एकूण एक हजार ७२ स्पर्धक सहभागी झाले होते. ही मॅराथान स्पर्धा मागील वर्षीची लक्षवेधक स्पर्धा ठरली.
संजिवनी कावळे राष्ट्रीय क्रिकेट संघात
क्रिकेटमधील एकापेक्षा एक सरस खेळाडू जिल्ह्यात आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मागील वर्षीचा आढावा घेतला असता याचीच प्रचिती येते. भद्रावती येथील लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी संजिवनी कावळे हिची राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळविले. ही बाब जिल्ह्यासाठी गौरवाची आहे.