गुंठेवारी प्रकरणात आरोपपत्र दाखल
By Admin | Updated: October 24, 2015 00:31 IST2015-10-24T00:31:46+5:302015-10-24T00:31:46+5:30
बहुचर्चित गुंठेवारी प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण ५४ जणांवर आज शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

गुंठेवारी प्रकरणात आरोपपत्र दाखल
५४ जण सहभागी : ७२ एकर कृषक जमीन अकृषक
ब्रह्मपुरी : बहुचर्चित गुंठेवारी प्रकरणातील आरोपी असलेल्या एकूण ५४ जणांवर आज शुक्रवारी ब्रह्मपुरीच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. अटकसत्र प्रक्रियेला पूर्णविराम मिळून आता या न्यायालयात खटला सुरू राहणार आहे.
ब्रह्मपुरीच्या इतिहासात कधी नव्हे एवढे गुंठेवारी प्रकरण गाजले. कायद्याच्या भाषेत ‘गुंठेवारी’ या शब्दाचा अर्थ चुकीचा काढून शहरातील ७२ एकर कृषक जमीन अकृषक करण्यात आली होती. हे प्रकरण जेव्हा उघडकीस आले, तेव्हा अनेकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर क्रमाक्रमाने अटकसत्र सुरू झाले होते. अटकसत्रात तत्कालिन उपविभागीय अधिकारी अरुण झलके, तत्कालिन मुख्याधिकारी रुपेश चव्हाण, नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता जयपाल बेदरे यांच्यासह नगरसेवक, बिल्डर, भूखंड मालक आदींचा समावेश होता. तत्कालिन तपास अधिकारी हेमंत खराबे यांनी तब्बल एक वर्षांपासून या प्रकरणाला तपासून घेत अनेकांची नावे या प्रकरणात समाविष्ट करून घेतली होती. त्यापैकी अनेकांनी अटकपूर्व जामीन मंजूर करुन घेण्यात यश मिळविले होते. परंतु आज या प्रकरणी न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्याने अटकसत्र येथे थांबलेले आहे. ज्या ५४ आरोपीविरुध्द आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला सुरू राहणार आहे. ज्या प्लॉटधारकांनी प्लाट घेतले आहेत, त्यांचे भविष्य अधांतरी असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)