ताडोबातील पर्यटकांना आता महिला गाईड करणार मार्गदर्शन

By Admin | Updated: March 8, 2015 00:33 IST2015-03-08T00:33:49+5:302015-03-08T00:33:49+5:30

व्याघ्रदर्शनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र उद्यानातील पर्यटकाच्या मार्गदर्शनासाठी यापुढे पुरूष गाईडच्या बरोबरीने महिला गाईडसुद्धा दिसणार आहेत.

Guides to guide women to Tadoba tourists now | ताडोबातील पर्यटकांना आता महिला गाईड करणार मार्गदर्शन

ताडोबातील पर्यटकांना आता महिला गाईड करणार मार्गदर्शन

चंद्रपूर : व्याघ्रदर्शनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र उद्यानातील पर्यटकाच्या मार्गदर्शनासाठी यापुढे पुरूष गाईडच्या बरोबरीने महिला गाईडसुद्धा दिसणार आहेत. वनविभागाच्या या कल्पनेनुसार पहिल्या टप्प्यात सहा महिला गाईडचे एक महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. ५ मार्चपासून त्यांनी अधिकृतपणे गाईड म्हणून कामही सुरू केले आहे.
महिला गाईड म्हणून पुढे येत या प्रांतातील पुरूष गाईडची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या या पहिल्या सहा गाईडमध्ये शहनाज बेग, काजल निकोडे, वर्षा जेंगठे, गायत्री वाढई, भावना वाढई आणि माया जेंगठे यांचा समावेश आहे. या महिला गाईडला सध्या एका एका वाहनांवर पाठविले जात असून पर्यटकांकडून प्रतिसाद घेतला जात आहे.
पर्यटक गाईड म्हणून येथे महिलांनी काम करण्याची ही तशी पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी २००९ मध्ये हा प्रयोग येथे अंमलात आणण्यात आला होता. त्यावेळी गाईड होण्यासाठी पुढे आलेल्या इच्छुक महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. त्यानंतर, १ जानेवारी २०१० रोजी शहनाज बेग यांनी पर्यटक वाहनावर महिला गाईड म्हणून पहिल्यांदा कामाला सुरूवात केली होती. मात्र वनविभागातील समन्वयाच्या अभावामुळे महिला गाईडचा मुद्दा थंड बस्त्यात पडला होता. मात्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक गणपती गरड यांनी पुन्हा नव्याने या दिशेने प्रयत्न करून महिला गाईड योजना सुरू केली आहे. परिणामत: आता पुन्हा या व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड सेवेत रूजू झाल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

महिला गाईडचे मनोबल खचविण्याचाही प्रयत्न
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यास जेमतेम दोन दिवस होत नाही तोच पुरुष गाईडकडून त्यांचे मनोबल खचविण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात महिला गाईड शहनाज बेग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे पती सुलेमान बेग यांनी या प्रकाराला दुजोरा दिला. महिला गाईडनी काम सोडावे यासाठी त्यांना धमक्या दिल्या जात असून असहकार्य केले जात असल्याचे ते म्हणाले. मात्र महिला गाईड आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Guides to guide women to Tadoba tourists now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.