मुलांचे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
By Admin | Updated: December 25, 2015 00:29 IST2015-12-25T00:29:44+5:302015-12-25T00:29:44+5:30
मतिमंद मुलांचे पालक व मुलांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी स्थानिक आयएमए हॉलमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांचे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
मतिमंदांसाठी आयोजन : आयएमए व रोटरी क्लबचा उपक्रम
चंद्रपूर : मतिमंद मुलांचे पालक व मुलांच्या शिक्षकांसाठी मंगळवारी स्थानिक आयएमए हॉलमध्ये एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मतिमंद मुलांचे शिकणे, सुधारणे, विकसित होणे, समजणे व स्मरणात ठेवणे अशा विविध प्रकारच्या बुद्धीमत्तेचा ऱ्हास तसेच मतिमंदाच्या या पाच अवस्थांपैकी प्रत्येक अवस्थेत कला कौशल्य निर्माण करुन त्यांची बौद्धीक क्षमता वाढविणे व त्या मुलांमध्ये आत्मविश्वास जागविणे या उद्देशाने रोटे. मनिषा पडगिलवार व डॉ. किरण देशपांडे यांच्या संकल्पनेतून मतिमंद मुलांच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन रोटरी क्लब आॅफ चंद्रपूर व इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन रोटरी क्लब आॅफ चंद्रपूरच्या अध्यक्षा अनुपा भाम्बरी व आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. अशोक भुक्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक येथील घरकूल परिवार संस्था संचालित मतिमंद मुलींच्या शाळेच्या प्राचार्य श्रीमती विद्या फडके उपस्थित होत्या.
मुलांचे संगोपन व संवर्धन हे पालकांसाठी व शिक्षकांसाठी खुप मोठे आव्हान असते. अशा मुलांच्या गरजा समजावून घेणे व त्यांचा विकास करण्यासाठी विद्या फडके खास नाशिकहून चंद्रपूरला आल्या होत्या.
या कार्यशाळेत पालक व शिक्षकांशी त्यांनी थेट संवाद साधला. विशेष मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यायचे, त्यांचा सांभाळ कशा पद्धतीने करायचा याबद्दल त्यांनी पालक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नसरीन मवानी यांनी विशेष मूल बालपणातून किशोरवयामध्ये प्रवेश करते तेव्हा कशा पद्धतीने काळजी घ्यायची याची माहिती दिली. यावेळी घरकूल संस्थेच्या विशेष मुली आदिती जाधव, सोनी जाधव, रोशन सावंत यांनी समूह नृत्य सादर केले, तर योजना गोखले, रेणुका देशपांडे यांनी कविता तर श्रृती देशमुख हिने गीत सादर केले. या कार्यक्रमाचे संचालन स्मिता जीवतोडे यांनी केले. (प्रतिनिधी)