सैनिक मेळावा तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
By Admin | Updated: April 27, 2015 01:05 IST2015-04-27T01:05:43+5:302015-04-27T01:05:43+5:30
२९ एप्रिल रोजी होणाऱ्या सैनिक मेळाव्याच्या तयारीचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.

सैनिक मेळावा तयारीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
चंद्रपूर : २९ एप्रिल रोजी होणाऱ्या सैनिक मेळाव्याच्या तयारीचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. सैन्याचे ले. जनरल आर.आर. निंभोरकर हे २९ एप्रिल रोजी सैनिकी शाळेच्या जागेची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर येथे येत असून त्या निमित्ताने होणारा मेळावा सैन्यदलाला साजेसा व्हावा, या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग व अधिकारी उपस्थित होते.
राज्यात दुसरी सैनिकी शाळा चंद्रपूर येथे होत असून या जागेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात तथा गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल आर.आर. निंभोरकर व त्यांची चमू २९ एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचे स्वागत योग्यप्रकारे व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. यासंबंधीची सर्व तयारी प्रशासनाने केली असल्याचे आशुतोष सलील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)