गैरप्रकार करणाऱ्यास बढती देऊन गौरव
By Admin | Updated: June 25, 2016 00:49 IST2016-06-25T00:49:24+5:302016-06-25T00:49:24+5:30
मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्ल्हारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी व तोहोगाव वनक्षेत्राचे तत्कालीन वनपाल ...

गैरप्रकार करणाऱ्यास बढती देऊन गौरव
वरिष्ठही सहभागी : एफडीसीएम अधिकाऱ्यांचा प्रताप
कोठारी : मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्ल्हारशाह अंतर्गत झरण वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी व तोहोगाव वनक्षेत्राचे तत्कालीन वनपाल अजय पवार यांनी सन २०१४-१५ या वर्षातील निष्कासनाच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केला. त्यांनी दहा ते पंधरा लाखाच्या शासकीय निधीची विल्हेवाट लावून महामंडळाला चुना लावला. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल न घेता उलट त्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून बढती देत गौरव केला आहे.
तोहोगाव वनपरिक्षेत्रात अजय पवार वनरक्षक म्हणून रुजू झाले. वनरक्षक ते वनपाल पदापर्यंत त्यांचा कार्यकाळ अनेक प्रकरणाने चर्चेत राहिला. आपल्या पदाचा व आपल्याकडील जंगल कामाचा त्यांनी चांगलाच फायदा घेतला. वेळोवेळी महामंडळाला आर्थिक चुना लावून स्वत:चे हित साधण्याचा सपाटा सुरू केला. त्यांच्या प्रत्येक गैरप्रकाराची वेळोवेळी तक्रारी झाल्या. मात्र वरिष्ठ अधिकारी स्वत:चे खिसे गरम करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षणाची कवच कुंडले प्रदान करीत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पदापर्यंत बढती दिली. त्यास इतर विभागात बदली करण्यापेक्षा मध्य चांदा प्रकल्पांतर्गत ठेवून गैरप्रकार करण्यास रान मोकळे सोडले आहे. सन २०१४-१५ या वर्षात तोहोगाव वनपरिक्षेत्रात वनपाल असताना त्यांनी कक्ष क्र. २९ टीपीआरडब्ल्यू कामात तसेच कक्ष क्र. २३ मध्ये बांबू फुलोरा बांबू कटाई कामात काम न करता निधीची उचल करुन अफरातफर केली. ७०० ते ८०० आडजात बीट तसेच दोन ते तीन हजार बांबू बंडल न तोडता पैशाची उचल केली.
सदर बाब ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात बाजार भावाप्रमााणे १३ लक्ष रुपयाचा गैरप्रकार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र ठोस कारवाई करण्यास दचकले. याबाबत विभागीय स्तरावर उलटसुलट चर्चा असून गैरप्रकार करण्यास बळ देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सक्त कारवाईची अपेक्षा नाही. (वार्ताहर)
वनमंत्र्यांनी लक्ष
देण्याची गरज
वनविकास महामंडळात अनेक गैरप्रकार होत असून त्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नाही. गैरप्रकारात अग्रेसर असलेल्या महामंडळाच्या कारभारावर सध्या कुणाचे नियंत्रण नाही. महामंडळाच्या कामात नियमितता आणण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केल्यास अपप्रकार करणाऱ्यांवर ठोस कारवाई होऊ शकते.