वाढोण्याच्या केरसुणीचा जिल्ह्यात लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:33+5:302021-04-12T04:25:33+5:30
घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : काही-काही गावांचे एक निश्चित वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळे त्या गावाचे नाव ...

वाढोण्याच्या केरसुणीचा जिल्ह्यात लौकिक
घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : काही-काही गावांचे एक निश्चित वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळे त्या गावाचे नाव पंचक्रोशीत होत असते. नागभीड तालुक्यातील वाढोणा या गावाचेही असेच आहे. येथील केरसुणी गृह उद्योगामुळे वाढोण्याच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.
नागभीड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले वाढोणा हे तसे स्वयंभू आणि तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव आहे. सभोवतालच्या आठ-दहा गावांची बाजारपेठ, राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव अशी स्वतंत्र ओळख असलेल्या या गावात केरसुणी गृह उद्योगाने चांगलीच गती पकडली असून, गावातील किमान १०० व्यक्ती या उद्योगावर आपले अर्थार्जन करतात, अशी माहिती आहे.
वाढोणा गावालगत मोठ्या प्रमाणात जंगल असून, या जंगलात सिंदीची झाडे आहेत. दिवाळी झाली झाली की, वाढोणा येथील काही ग्रामस्थ केरसुणी निर्मितीच्या कामाला सुरूवात करतात. यासाठी जंगलातून सिंद आणून ती केरसुणीयोग्य करणे. नंतर त्याची केरसुणी तयार करणे व तयार झालेल्या केरसुणीची विक्री करण्यासाठी गावागावात जाणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. नागभीड व तळोधी परिसरातील गावात ज्या केरसुणी मिळतात, त्या बहुतेक वाढोणा येथे तयार झालेल्याच असतात.
दिवाळीपासून सुरू झालेला हा वाढोण्यातील केरसुणी गृह उद्योग जून, जुलै महिन्यापर्यंत चालतो. एकदा पावसाने सुरूवात केली की, मग या उद्योगात असलेले शेतीच्या कामात व्यस्त होतात, अशी माहिती केरसुणी विक्रेत्या शोभा कावळे या महिलेने दिली.
बॉक्स
हिंस्त्र श्वापदांची भीती
केरसुणीसाठी आवश्यक असलेली सिंद ही जंगलातूनच आणावी लागते. वाढोणालगतचा जंगल परिसर घनदाट आहे. या जंगलात जंगली श्वापदांनी मानवावर हल्ला केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे भीतीयुक्त वातावरणातच या व्यावसायिकांना जंगलातून सिंद आणावी लागते.
बॉक्स
रेल्वे बंदचा फटका
वाढोण्यातील या केरसुणी गृह व्यवसायाला मागील वर्षापासून बंद असलेल्या रेल्वेचा मोठा फटका बसला आहे. गोंदिया - चंद्रपूर ही रेल्वे सुरू होती, तेव्हा वाढोण्यातील हे केरसुणी विक्रेते रेल्वेने वाहतूक करून चंद्रपूर, बल्लारपूर व चंद्रपूरच्या आसपासच्या वसाहतीमध्ये केरसुणी विकायचे. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेने केरसुणी व्यवसायाला चांगलाच फटका बसला आहे. आता त्यांना तयार केलेल्या केरसुणी नागभीड व सिंदेवाही तालुक्यातच विकाव्या लागत आहेत.