युवकांचे जत्थे परराज्यात
By Admin | Updated: May 16, 2015 01:42 IST2015-05-16T01:42:57+5:302015-05-16T01:42:57+5:30
१८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या ...

युवकांचे जत्थे परराज्यात
ब्रह्मपुरी : १८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या मध्यस्थीने त्यांना परराज्यात नेऊन अल्पदरात काम करवून घेतले जात आहे. यात काही प्रमाणात त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषणही केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे.
शासनाच्या योजना चांगल्या असूनही योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात नसल्याने अनेक बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे घ्यायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. दोन-चार महिने कुठे तरी काम करावे, असा प्रयत्न सुरू असतो. परंतु शहरात व तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती अजूनही झाली नाही व मोठमोठ्या कारखान्याच्या निर्मितीचाही अभाव असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या दुकानात नोकर राहण्यापलीकडे दुसरा रोजगार सध्या तालुक्यात अस्तित्वात नाही. म्हणून बेरोजगारांनी परराज्यात जाऊन काम करणे पसंत केले आहे. भरारमेंढा, किन्ही, किरमिरी (मेंढा) हळदा, आवळगाव व अन्य भागातून अनेक बेरोजगार बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता अशा मोठ्या महानगरात स्थानिक ठेकेदारांच्या मध्यस्थीने नेऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. या कामाचा मोबदला देताना त्यांची काही प्रमाणात शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक शोषणही केले जात असल्याची माहिती परतून आलेले युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. शासनाने अनेक योजनांचा गाजावाजा करुन फक्त कागदावरच त्या गुंडाळलेल्या असल्याने बेरोजगारांना दारोदार भटकंती करण्याची दरवर्षी वेळ येत असल्याचीही भावना बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील जवळजवळ ५०० ते ६०० बेरोजगार युवक विविध कंपन्यांच्या कामावर आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इत्यादी राज्यात कामांना गेल्याचे दिसून येत आहे. एखाद्या दुकानासाठी अथवा व्यवसायासाठी बँकेने कर्ज द्यायचे म्हटले तर अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड काम असते व गॅरंटीचा प्रश्नही समोर उभा राहतो.
दुकान किंवा व्यवसाय उभारण्यासाठी बेरोजगारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असते. शासनस्तरावर काही अटी शिथिल केल्यास बेरोजगारांना सहज कर्ज मिळेल, अशी सोय करून देण्याचीही मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. मोठ्या पैशाच्या आमिषाला बळी पडून बेरोजगारांचा हिरमोड होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. सुरुवातीला मध्यस्थी करणारा स्थानिक ठेकेदार कंपनीच्या दारापर्यंत दिसतो. नंतर तो ठेकेदार भूमिगत होत असल्याने बेरोजगारांना परराज्यात वालीच उरत नसल्याने जे मिळेल ते खाऊन आपत्तीचा भार सहन करीत त्यांचे आयुष्य जगणे सुरू असते.
विशेष म्हणजे, परराज्यात गेलेल्या या बेरोजगारांच्या असहायतेचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन त्यांच्याकडून अवजड व जादा काम करवून घेत असल्याचीही माहिती आहे. गरजवंत असल्याने हे बेरोजगार याबाबत काहीही बोलत नाही. मजुरी देतानाही त्यात दांडी मारली जाते.
बेरोजगारांच्या समस्येकडे शासनाने दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील बेरोजगार युवक करीत आहेत. अन्यथा दिवसेंदिवस बेरोजगारीच्या भस्मासूर वाढून भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
उद्योगांचा अभाव
स्थानिक पातळीवर स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण होत असतानाही एमआयडीसीची निर्मिती झाली नसल्याने बेरोजगारांना इतर राज्यात कामासाठी जावे लागत असते. ब्रह्मपुरी येथे एमआयडीसीची मागणी जुनी असून फक्त जागा सीमांकित करून फलक लावण्यात आले आहे. परंतु एकही लहान मोठा उद्योग सुरू झाला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून बेरोजगारी वाढली आहे.