निळ्या पाखरांचे बाबासाहेबांना अभिवादन

By Admin | Updated: April 15, 2016 01:08 IST2016-04-15T01:08:31+5:302016-04-15T01:08:31+5:30

माणसाला माणुसकीची शिकवण देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूवारी ...

Greetings to blue foil babasaheb | निळ्या पाखरांचे बाबासाहेबांना अभिवादन

निळ्या पाखरांचे बाबासाहेबांना अभिवादन

चंद्रपूर : माणसाला माणुसकीची शिकवण देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरूवारी शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या जयंतीनिमित्त येथे हजारो अनुयायांनी अभिवादन केले.
यानिमित्त शहरातील गांधी चौक मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळपासूनच बौद्ध अनुयायांचे जत्थेच्या जत्थे दाखल होत होते. डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करीत होते. यानिमित्त या ठिकाणी आज दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले.
विविध आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून सामूहिक बुद्धवंदना केली. यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, महात्मा ज्योतिबा फुले तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे युथ सोशल फोरम, राजगिरी फाऊंडेशन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स चंद्रपूर व थेंब ग्रुपसह चंद्रपूर शहरातील सामाजिक, धार्मिक, कर्मचारी संघटना, बौद्ध मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी पुतळ्यासमोर मेणबत्त्या उजळून बाबासाहेबांना पुष्प अर्पण केले.
जयंती समारोहादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लहान मुलांनीदेखील भीमगिते सादर केली. भिक्खू संघाच्या धम्मदेसनासह विविध कार्यक्रम यावेळी पार पडले.
यासोबतच शहराच्या कानाकोपऱ्यातील बुद्ध विहारात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोषणाई आणि पताकांनी बुद्धविहार सजविण्यात आले होते. शासकीय कार्यालयातदेखील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी नगराध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, अ‍ॅड.विजय मोगरे, संजय रत्नपारखी, केशव रामटेके, वैशाली गेडाम, अ‍ॅड.भास्कर दिवसे, श्रीकांत चहारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

केक कापून जयंती साजरी
शहरात आज ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला. शहरातील आंबेडकरी संघटनांतर्फे पंचशिल ध्वजासह मोटारसायकल रॅली काढण्यात आली. अनेक युवकांनी दीक्षाभूमीवर एकत्र येऊन जयंती साजरी केली. जयंती समारोहानिमित्त आंबेडकरी संघटनांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी थंड पाणी, खिर, सरपत, बुंदी व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

‘जय भीम’ चा गजर
सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून वाजत-गाजत रॅली काढण्यात आली. यात हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले होते. ‘जय भीम’, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहब तुम्हारा नाम रहेगा’ अशा घोषणा देत ही रॅली जटपुरा गेटकडे निघाले. मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पुढे ही रॅली चांदा क्लब ग्राऊंडकडे मार्गस्थ झाली.

Web Title: Greetings to blue foil babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.