तूर व हरभऱ्यासाठी मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:25 IST2019-06-08T00:24:22+5:302019-06-08T00:25:47+5:30
हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

तूर व हरभऱ्यासाठी मिळणार अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व चना खरेदीसाठी नोंदणी झाल्यावर मालाच्या विक्रीसाठी केंद्रावर आणण्याचा आॅनलाईन संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी आधार असलेल्या बँक खात्याची प्रत खरेदी केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.
हरभरा व तूर या पिकाच्या विक्रीसाठी २०१७-१८ या हंगामाकरिता आॅनलाईन नोंदणी आवश्यक करण्यात आली होती. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी आणण्याकरिता संदेश पाठविण्यात आला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना हा संदेश मिळाला नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करता आली नाही. परिणामस्वरूप माल पडून राहिला. काहींना खासगी व्यापाऱ्यांना मालाची कमी दरात विक्री करावी लागली. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर संदेश न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक असलेले बँक खात्याची प्रत जोडली नसल्याने अनेकांचा निधी परत आला. त्या शेतकऱ्यांना सात दिवसात आधार क्रमांक लिंक असलेला बँक खात्याची माहिती आॅनलाइन केलेल्या केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केले आहे.