धानोलीत साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर
By Admin | Updated: October 11, 2014 23:06 IST2014-10-11T23:06:35+5:302014-10-11T23:06:35+5:30
वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली.

धानोलीत साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर
चंद्रपूर : वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदारांच्या सोयीसाठी धानोली या साहाय्यकारी मतदान केंद्राला निवडणूक आयोगाने मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यासाठी आयोगाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
१५ आॅक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ दरम्यान वरोरा विधानसभातंर्गत भद्रावती तालुक्यातील धानोली या गावामधील मतदान केंद्र सेलोटी वाघेडा या गावात स्थलांतरित करण्यात आले. यामुळे धानोली गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. धानोली येथे सर्वाधिक मतदार असल्याने आणि धानोली ते सेलोटी वाघेडा या गावामध्ये अंतर सात किलोमीटर इतके असल्याने धानोली गावामध्येच मतदान केंद्र असावे, या मागणीसाठी तेथील लोकांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे धानोली गावातील नागरिक मतदानापासून वंचित राहिले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने धानोली येथील मतदान केंद्र नामंजूर केले होते. धानोली येथील नागरिकांची भावना लक्षात घेता निवडणूक विभागाने पुन्हा एकदा ५ आॅक्टोबरला मतदान केंद्राबाबत सुधारित प्रस्ताव मुख्य निवडणूक अधिकारी मुंबई यांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर होण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी आणि दिल्ली येथील निवडणूक आयोगामधील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जे.पी. लोढे यांनी देखील पाठपुरावा केला. याची दखल घेत निवडणूक आयोगाने धानोली हे साहाय्यकारी मतदान केंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांचा पाठपुरावा व आयोगाच्या या निर्णयामुळे मतदारांना दिलासा मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)