ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच
By Admin | Updated: January 19, 2016 00:41 IST2016-01-19T00:41:28+5:302016-01-19T00:41:28+5:30
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे.

ग्रामसेवकांनो, शेतकऱ्यांबाबत खबरदारी घ्याच
कल्पना बोरकर यांचा सल्ला : बल्लारपुरात कृषी विभागाची आढावा सभा
बल्लारपूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. कृषिक्षेत्राचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. शेती उत्पादनात वाढ होणे क्रमप्राप्त आहे. यासाठी कृषी क्षेत्रात नियोजनपूर्वक विकासाची गरज आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या योजना सांगून त्याची अंमलबजावणी करावी, ग्रामसेवकांनो, शेतकऱ्याबाबत खबरदारी घ्याच, असा निर्वाणीचा सल्ला जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती कल्पना बोरकर यांनी शनिवारी येथील कृषी विभागाच्या आढावा सभेत दिला.
बल्लारपूर पंचायत समितीच्या कृषी विभागाने येथील सभागृहात आढावा सभा घेतली. सभेला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडून कृषी विभागाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरु, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रविण देशमुख, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, किन्ही येथील सरपंच जीवनकला आलाम यांची उपस्थिती होती. दरम्यान, कल्पना बोरकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करुन चंद्रकला बोबाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपयोजनाची माहिती घेण्यात आली. विशेष म्हणजे, सदर योजनेतील लाभार्थ्यांचे सन २०१५-१६ चे लक्षांक ८० शेतकरी असताना प्रत्यक्षात केवळ १८ शेतकऱ्यांनीच अर्ज सादर केल्याने प्रविण देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. लक्षांक पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पंचायत कृषी विभागाला दिले. तालुक्यातील ६ हजार ३०८ शेतकऱ्यांची संख्या असताना लाभार्थी शेतकरी कसे मिळत नाही, असेही त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सुनावले. संचालन पंचायत कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. आभार पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)