निधी हडपल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर ठपका
By Admin | Updated: May 29, 2014 23:57 IST2014-05-29T23:57:56+5:302014-05-29T23:57:56+5:30
कोरपना पंचायत समितीअंतर्गत येणार्या गाडेगाव येथील ग्रामसेविकेने सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार केला आहे. संवर्ग विकास अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत तब्बल १४ लाख ४४ हजार १४१ रुपयांचा

निधी हडपल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर ठपका
चंद्रपूर : कोरपना पंचायत समितीअंतर्गत येणार्या गाडेगाव येथील ग्रामसेविकेने सार्वजनिक निधीचा गैरव्यवहार केला आहे. संवर्ग विकास अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत तब्बल १४ लाख ४४ हजार १४१ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ग्रामसेविकेवर ठेवण्यात आला आहे. गैरव्यवहार करणार्या ग्रामसेविकेचे निलंबन आणि विभागीय चौकशीची कार्यवाही करण्याबाबत अहवालात म्हटले आहे. चौकशीचा हा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकार्यांकडे पाठविण्यात आला असून, त्यावर एक-दोन दिवसांत निर्णय होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.
कोरपना तालुक्यातील गाडेगाव विरूर येथील ग्रामसेविका करूणा खनके यांनी २0१0-११ आणि १२ या वर्षात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार केले होते. या गैरव्यवहाराच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. गावकर्यांचा दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चौकशीचे आदेश प्राप्त झाले होते. कोरपना पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी मानकर यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी गाडेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या संपूर्ण कामाची चौकशी काही महिन्यांपूर्वीच केली. चौकशीत २८ मुद्दे त्यांनी काढले. त्यात गैरव्यवहार झाल्याचेही संवर्ग विकास अधिकार्यांनी अहवालात नमूद केले आहे.
अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी नसताना ग्रामसेविका खनके यांनी २0११-१२ या सत्रात रस्ते, गटार दुरुस्तीची ४३ हजार ३00 रुपयांची कामे केली. २0१२-१३ या सत्रात ३९ हजार ७00 रुपये, तर २0१0-११ या सत्रात ३८ हजार ४५ रुपयांची कामे केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता नसतानाही २00८-0९, २0११-१२ या सत्रात पूल बांधकाम, खडीकरणाचीही कामे त्यांनी केली. निविदा प्रकाशित न करता त्यांनी ११ लाख ४९ हजार ५३४ रुपांची नियमबाह्य कामे केली. निविदा न मागविता २0११-१२ या सत्रात पाच लाख ५0 हजार ७00 रुपये किंमतीच्या सिमेंट प्लग बंधार्याचे काम त्यांनी केले. २0१३-१४ या सत्रातही पाच लाख ९८ हजार ७८४ रुपयांचा बंधारा बांधला. याही कामाची त्यांनी निविदा काढली नाही. वित्त आयोगाच्या एक हजार ५00 रुपये रकमेची नोंद अनामत रजिस्ट्ररमध्ये न घेता त्यांनी त्याचा वापर केला. २0 टक्के मागासवर्गीय खर्चाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मंजुरी नसतानाही निधी खर्च केला. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून १0 टक्के रक्कम महिला व बालकल्याणावर खर्च करायची होती. त्यांनी एक हजारांची पुस्तके खरेदी केली. मात्र, या पुस्तकांचे वाटपच करण्यात आले नाही. २0१२-१३ सत्रात इलेक्ट्रिक साहित्य खरेदीबाबत कोटेशन मागविण्यात आले होते. गडचांदुरातील गुरुदेव इलेक्ट्रिकल यांच्या कमी दराच्या निविदा आल्या. त्यामुळे साहित्य त्यांच्याकडून खरेदी करावयास हवे होते.
मात्र, नांदाफाटा येथील जयश्री स्टोअर्सकडून साहित्य खरेदी करण्यात आले. यामुळे नऊ हजार ९५0 रुपयांचा फटका बसला. ग्रामपंचायतीचे एक लाख १0 हजार २३३ रुपये त्यांनी स्वत: वापरल्याचा ठपका ग्रामसेविका खनके यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सध्या खनके ग्राणी पाणीपुरवठा विभागात पाणी गुणवत्ता निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या विभागात फारसा अनुभव नसतानाही त्यांची बदली करण्यात आली होती. (प्रतिनिधी)