ग्रामोदय संघ भद्रावती येथे साकारणार कुंभारी क्लस्टर प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:51+5:302021-01-19T04:29:51+5:30
: पारंपरिक कलेकडून आधुनिकतेकडे वाटचाल भद्रावती : कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या व कुंभार उद्योगाला पारंपरिक कलेपासून आधुनिकतेकडे नेणाऱ्या भद्रावतीतल्या ...

ग्रामोदय संघ भद्रावती येथे साकारणार कुंभारी क्लस्टर प्रकल्प
: पारंपरिक कलेकडून आधुनिकतेकडे वाटचाल
भद्रावती : कलात्मक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या व कुंभार उद्योगाला पारंपरिक कलेपासून आधुनिकतेकडे नेणाऱ्या भद्रावतीतल्या ग्रामोदय संघात कुंभारी क्लस्टर प्रकल्प उभारला जाणार असून, यासाठी २०१ कुंभार कारागिरांची निवड करण्यात आली आहे.
सदर प्रकल्प एक करोड ८१ लाख रुपयांत उभारण्यात येणार असून, खादी ग्रामोद्योग आयोगाद्वारे याला मंजुरी मिळाली आहे. बेरोजगारी कमी होऊन रोजगार वाढण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाची स्फूर्ती नावाची योजना आहे. त्या अंतर्गत सदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
कारागिरांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पात ग्रामोदय संघही इम्प्लिमेंटरी एजन्सी असून, सिरामिक क्लास अनुसंधान केंद्र खुर्जा भारत सरकार ही तांत्रिक एजन्सी आहे.
ग्रामोदय संघाने या प्रकल्पासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली असून २०१ कुंभार कारागीर शेअर कॅपिटल म्हणून १४ लाख रुपये या प्रकल्पासाठी लावणार आहे.
या प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ जानेवारीला दुपारी १ वाजता होणार आहे. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खादी ग्रामोद्योग आयोगाचे (पश्चिम क्षेत्र) उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, एल. के. मिश्रा, व्ही. एस. लाडे, ग्रामोदय संघ भद्रावतीचे अध्यक्ष जितेंद्र कुमार, उपाध्यक्ष विजय श्रीवास्तव, सचिव आयुब हुसेन हे उपस्थित राहणार आहेत.
बॉक्स
ग्रामोदय संघाचा असा आहे इतिहास
ग्रामोदय संघाची स्थापना कृष्णमूर्ती मिर मीरा यांनी १९५५ ला भद्रावती येथे केली. सात हजार एकरमध्ये ग्रामोदय संघ वसले असून आज या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, रिसर्च प्रोग्राम, राखेपासून विटा तयार करणे, कौशल विकास प्रशिक्षण, नेहरू विद्यामंदिर तसेच गडचिरोली येथे एक युनिट सुरू आहे. ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष जितेंद्र कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन ग्रामोद्योग संघाविषयी माहिती सांगितली .त्यानंतर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट देऊन याबाबतची माहिती ना, नितीन गडकरी यांना सांगितली .दिल्लीमध्ये याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सदर प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळाल्याचे जितेंद्रकुमार व विजय श्रीवास्तव यांनी सांगितले.