ग्रामसभेत कोरम पूर्ण होऊनही ग्रामसभेला स्थगिती
By Admin | Updated: February 3, 2016 01:10 IST2016-02-03T01:10:05+5:302016-02-03T01:10:05+5:30
सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आयोजित ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊनही ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

ग्रामसभेत कोरम पूर्ण होऊनही ग्रामसभेला स्थगिती
वासेरा ग्रामपंचायत : ग्रामविकास अधिकाऱ्याचा मनमानी कारभार
वासेरा : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे आयोजित ग्रामसभेचा कोरम पूर्ण होऊनही ही ग्रामसभा स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यात विषय क्रमांक १ ते १४ ठेवण्यात आले. विषय क्रमांक १ ते १४ पर्यंतच्या विषयाची चर्चा सुरू करण्यात आली. त्यात सभाध्यक्ष म्हणून सरपंच सरिता मेश्राम यांची निवड करण्यात आली. सभेला सुरुवात होऊन विषय क्रमांक १ ते १४ ला चर्चेसाठी घेण्यात आले. विषय क्र. १४ इको डेव्हलपमेंट समितीची निवड करणे हा होता. त्यानुसार निवड प्रक्रीया सुरू झाली. त्यात ग्रामपंचायत गटातून आठ सदस्यांची निवड करण्यात आली. नंतर उर्वरित नावे येण्यास सुरुवात झाली असता वासेरा येथील ग्रामविकास अधिकारी महेंद्र भडके यांनी हेतुपुरस्सर स्वत:च्या मर्जीने ग्रामसभा स्थगित झाल्याचे ग्रामस्थांना सांगून सभा गुंडाळली.
ग्रामसभेला सुरुवात झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी महेंद्र भडके हे विषय सुचीवरील विषयाचे वाचन करीत होते. १ ते १३ विषय संपून १४ व्या विषयाला सुरुवात झाली त्यात इको डेव्हलपमेंट समिती गठीत करणे हा १४ वा विषय होता. त्यात ग्रामपंचायत गटातून सदस्यांचे निवड करणे होते. त्यात आठ सदस्यांची निवड करण्यात आली. नंतर वेगवेगळ्या आरक्षणातून निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यात एकापेक्षा जास्त नावे आली. निवडणूक प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामसभा स्थगित झाल्याचे जाहीर केले. ग्रामसभेला कधी नव्हे एवढी विक्रमी उपस्थिती होती.
गावकऱ्यांमध्ये रोष
कोरम पूर्ण असतानाही ग्रामसभा स्थगित करणे हे बेकायदेशिर असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त होत आहे. ग्रामसभेत गोंधळ झालेला नाही तरी ग्रामसभा कशी काय स्थगित केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गावकऱ्यांची विक्रमी उपस्थिती असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्याने पोलिसांना पाचारण केले. गोंधळ झाला असता तर पोलीस उपस्थित होतेच परंतु गोंधळ झाला नाही तरी ग्रामसभा स्थगित करण्यात आली.
विषय क्र. १४ सुरू असताना एकापेक्षा जास्त नावे आले तसेच इको डेव्हलपमेंट समिती स्थापना करणे विषय ठेवण्यात आला होता. इको डेव्हलपमेंट समितीबाबत वनविभागाने परीपत्रक न दिल्याने सभा स्थगित केली.
- महेंद्र भडके,
ग्रामविकास अधिकारी, वासेरा
इको डेव्हलपमेंट समिती गठीत करताना ग्रामपंचायतीतून आठ सदस्य निवडले. ग्रामसभेत गोंधळ झाला नाही. ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वत:च्या मनमानी कारभाराने सभा स्थगित केली. याबद्दल आम्ही वरिष्ठस्तरावर तक्रार करून न्याय मागणार आहोत.
- योगराज आनंदे, राजू नंदनकर, दिलीप मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य