ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी
By Admin | Updated: January 6, 2016 01:05 IST2016-01-06T01:05:08+5:302016-01-06T01:05:08+5:30
कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

ग्रामपंचायतींची तिजोरी रिकामी
अत्यल्प उत्पन्नात खर्च मात्र अवाढव्य : गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष
मंगेश भांडेकर चंद्रपूर
कारभार सांभाळण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत नावाची संस्था स्थापन केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. मात्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची सध्याची आर्थिक स्थिती पाहता, अत्यावश्यक सेवाही पुरविण्यास ग्रामपंचायती सक्षम नसल्याची गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची झाली आहे. ‘उत्पन्न कमी आणि खर्च जास्त’ असा प्रकार अनेक ग्रामपंचायतीत सुरू असल्याने जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्यात ठणठणाठ आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावातील ग्रामपंचायतीला मोठे महत्त्व आहे. राज्य शासन विविध उपक्रम राबवून उपक्रमात भाग घेणाऱ्या व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना लाखो रूपयांचा निधी देतो. तर गृह कर, पाणीपट्टी, दिवाबत्ती आदींच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांकडून करवसूली करीत असते. मात्र उत्पन्न कमी आणि खर्चच जास्त असल्याने अनेक ग्रामपंचायतींजवळ आवश्यक सुविधा पुरविण्यासाठीही निधी शिल्लक नाही.
गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे, बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाला करावे लागते. या माध्यमातून लाखो रूपयांचा महसूल ग्रामपंचायतीला मिळत असते. मात्र या उत्पन्नानंतरही अनेक ग्रामपंचायतींचे भागत नसल्याची स्थिती आहे.
केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी
जिल्ह्यात ८३७ ग्रामपंचायती आहेत. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जिल्ह्यातील ८३७ ग्रामपंचायतींकडे केवळ २ लाख २७ हजार १११ रूपयाचा निधी शिल्लक होता. वर्षभरात सर्व ग्रामपंचायतींना ८३ लाख ९० हजार ९५९ रूपयाचा महसूल मिळाला. यातून ५३ लाख १७ हजार ७७१ रूपयाचा निधी विविध कामांवर वर्षभरात खर्च झाला आहे. आता केवळ मोठ्या ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून लहान ग्रामपंचायतींच्या तिजोऱ्या रिकाम्या पडल्या आहेत.
उत्पन्न कमी, खर्च जास्त
अनेक ग्रामपंचायती उत्पन्न कमी असतानाही खर्च अधिक करीत असल्याने अत्यावश्यक सेवांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. पोंभुर्णा तालुक्यात ३१ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना वार्षिक उत्पन्न ८७ हजार ९ रूपये मिळाले. मात्र यानंतरही ग्रामपंचायतींनी प्रारंभीच्या शिल्लक उत्पन्नातून ९३ हजार ४५ रूपयाचा खर्च केला आहे. तसेच कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींना ७६ हजार ५६९ रूपये उत्पन्न मिळाले. या ग्रामपंचायतींनी ७८ हजार रूपयाचा खर्च केला आहे.
थकीत करामुळे वाढला भार
ग्रामपंचायत प्रशासनाकडून दरवर्षी कर वसूली केली जाते. मात्र अनेक नागरिक वेळेवर कराचा भरणा करण्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकांकडे तीन ते चार वषाचे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाचे कर थकीत असते. मात्र अशा नागरिकांवर ग्रामपंचायत प्रशासनन बरेचदा कारवाई करीत नाही. कर वसूली दरवर्षी योग्यरित्या झाली तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडून आर्थिक ताण कमी होऊ शकतो.