ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण
By Admin | Updated: September 7, 2015 01:16 IST2015-09-07T01:16:40+5:302015-09-07T01:16:40+5:30
तालुक्यातील खराळपेठ येथील ग्रा.पं. निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये तीन वेगळ्या पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय खेळीतून मर्यादा ओलांडत ...

ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण
पोलिसात तक्रार : अपहरणकर्त्यांविरूद्ध गुन्हा नोंद
गोंडपिपरी : तालुक्यातील खराळपेठ येथील ग्रा.पं. निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये तीन वेगळ्या पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने राजकीय खेळीतून मर्यादा ओलांडत एका ग्रा.पं. सदस्याचे अपहरण करून तब्बल तीन तासाने त्याची सुटका करण्यात आली. याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आरोपी अपहरणकर्त्याविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.
तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या खराळपेठ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. यात माजी सरपंच अभय आबाजी शेंडे यांच्या गटाचे ५, सोमनाथ खारकर गटाचे ३ तर सुधीर अवधरे गटाचा १ सदस्य निवडून आले. आगामी ७ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अभय शेंडे गटाचा विजय निश्चित असल्याचे पाहून आज सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान नवनियुक्त ग्रा.पं. सदस्य अभय शेंडे हे गोंडपिपरीकडे आपल्या दुचाकी वाहनाने जात असतांना त्यांना खराळपेठ बसस्थानकावर अडवून वाहनात कोंबण्यात आले. सुधीर अवथरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपहरण करून नेल्याची तक्रार अभय शेंडे यांच्या पत्नीने गोंडपिपरी पोलिसात दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता घटनेच्या वेळेपासून तब्बल तीन तासाने अभय शेंडे हे खराळपेठ बसस्थानकावर पोहोचले. तत्पूर्वी अभय शेंडे यांच्या भ्रमणध्वनीवर अनेकांनी संपर्क साधला असता, फिरण्यासाठी नजिकच्या आष्टी या गावी गेल्याची माहिती मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र यानंतर या नाट्यमय अपहरण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. गावातील काही नागरिक व अभय शेंडे यांनी गोंडपिपरी पोलीस ठाणे गाठून चाकूचा धाक दाखवून विरोध पॅनलचे सुधीर व जगदीश अवथरे व वाहन चालक यांनी आपले अपहरण केल्याची कबुली दिली. तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी आरोपी सुधीर व जगदीश अवथरे यांचेवर भादंवि कलम ३६३, ३६५ (३४), १७१ (क) (ख) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
घटनेचा तपास गोंडपिपरी पोलीस करित असून आरोपीचा अद्यापही शोध लागला नाही. (तालुका प्रतिनिधी)