पोंभुर्णा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक ज्वर शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:13 IST2021-01-13T05:13:01+5:302021-01-13T05:13:01+5:30
घोसरी : ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढलेला असून गावातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. गटातील उमेदवार निवडणूक जिंकण्याकरिता ...

पोंभुर्णा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक ज्वर शिगेला
घोसरी : ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढलेला असून गावातील राजकीय वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. गटातील उमेदवार निवडणूक जिंकण्याकरिता फेसबुक-व्हाॅट्सॲपच्या हायटेक प्रचारातून कसोशीचे प्रयत्न करताना दिसत असले तरी मात्र राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्यांंना त्यांच्या गावातच उमेदवार उभे करता न आल्याने त्यांची विश्वासार्हता यानिमित्ताने पुढे आल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींकरिता निवडणुका होत असून संवेदनशील असलेल्या देवाडा (खुर्द), घोसरी, घाटकुळ, नवेगाव (मोरे), देवाडा (बुज), जुनगाव, फुटाणा, भिमणी, चेक ठाणेवासना येथील निवडणुकीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधलेले आहे.
एवढेच नव्हे तर तालुक्यात राजकीय पक्षांचे नेतृत्व करणारे तालुका अध्यक्ष, उपतालुका प्रमुख हे फेसबुक व व्हॉट्सॲपमध्ये बॅनरबाजी करण्यात धन्यता मानत आहेत; परंतु गावातील त्यांच्या गटाला पुरेसे उमेदवार उभे न करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.
देवाडा (खुर्द) येथे विशेषतः दोन जि. प. सदस्य व पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे. विद्यमान उपसभापतीचे मूळ गाव असताना भाजप गटाला ११ उमेदवार उभे करता आले नाहीत. तसेच भाजपा जिल्हाध्यक्षाचे कार्यक्षेत्र असलेल्या नवेगाव मोरे येथेही भाजपाला राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जुळवून घ्यावे लागले.
हीच परिस्थिती तालुका कॉंग्रेस अध्यक्षांच्या स्वगाव दिघोरी येथे दिसत असून त्यांना केवळ स्वत:च्या मुलासह एका महिलेला रिंगणात ठेवावे लागले आहे. तसेच जुनगाव येथील माजी सरपंच व शिवसेना उपतालुकाप्रमुख यांनीही माघार घेतली असून भाजपाचे राहुल पाल यांचे गटाचे ३ उमेदवार अविरोध ठरल्याने बाजू भरभक्कम दिसत आहे.
फुटाणा येथेही भाजपाचे नैलेश चिंचोलकर यांच्या गटाचा सामना कॉंग्रेस गटाचे किशोर अर्जुनकर यांच्या गटाशी होणार आहे. तसेच घाटकुळ, चेक ठाणेवासना येथे परस्पर गटात भिडत होणार आहे.
वेळवा ( माल) येथील शिवमहोत्सव समितीने निवडणूक रणशिंग फुंकले असून रिंगणातील सहा उमेदवार उच्चशिक्षित असल्याने येथील लढतीकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधलेले आहे.
एकंदरीत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत गटागटांतील उमेदवार आमने-सामने आहेत; परंतु राजकीय पक्षाचे कॉंग्रेस-भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस हे आपले नेतृत्व सरस असल्याचे भासवीत असल्याने गोंधळात गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसत आहे.