कर्जमाफीच्या जाचक अटींच्या जीआरची होळी
By Admin | Updated: June 23, 2017 00:37 IST2017-06-23T00:37:09+5:302017-06-23T00:37:09+5:30
शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारने लावलेल्या चुकीच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती

कर्जमाफीच्या जाचक अटींच्या जीआरची होळी
निवेदन सादर : किसान क्रांती मोर्चा व विविध संघटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकारने लावलेल्या चुकीच्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व विविध सामाजिक संघटना ब्रह्मपुरी यांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
यावेळी शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या आदी मागण्यासाठी किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व सामाजिक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्रह्मपुरीचे नायब तहसीलदार संजय पुंडेकर यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या वतीने राज्यभर शेतकऱ्यांकरिता स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात, सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेत तत्वत: कर्जमाफी देण्यासाठी जाचक अटी असलेल्या शासन निर्णय जारी केला आहे. या अटींनुसार, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे कठीण आहे. या जाचक अटी शेतकऱ्यासाठी मारक असल्यामुळे त्याविरोधात किसान क्रांती मोर्चा समन्वय समितीने आवाज उठवून राज्यभर या शासन निर्णयाची होळी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ब्रह्मपुरी येथे किसान क्रांती मोर्चा समन्वय समिती व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मारक असलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शिष्टमंडळात कॉ. विनोद झोडगे, महेश पिलारे, मोंटू पिलारे, अतुल राऊत, प्रा. अंकुश मातोरे, प्रा. अमृत नखाते, जि.प. सदस्य प्राचार्य राजेश कांबळे, माजी नगरसेवक विलास विखार, सुधीर पिलारे, वामन मिसार, डॉ. प्रेमलाल मेश्राम, रवी पवार, शामराव भानारकर, विनायक रामटेके, छोटू धोंगडे आदी उपस्थित होते.