काठावर बहुमत मिळविलेल्या ग्रा.पं. मध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:28 IST2021-01-25T04:28:55+5:302021-01-25T04:28:55+5:30
ब्रम्हपुरी : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आले. यात काही प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला तर ...

काठावर बहुमत मिळविलेल्या ग्रा.पं. मध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच
ब्रम्हपुरी : तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये अनेक धक्कादायक निकाल हाती आले. यात काही प्रस्थापितांना मतदारांनी जोरदार धक्का दिला तर काहींना गड राखण्यात यश मिळाले. या निवडणुकीत विशेष म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये बहुमत मिळालेल्या पॅनलचे प्रमुखच पराभूत झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे चित्र निर्माण झाले आहे तर काही ग्रामपंचायतींमध्ये अगदी काठावर बहुमत मिळाल्याने अशा गावातील सरपंच पदाच्या निवडीच्या वेळी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीचा पाया म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. अनेक तरुणांनी या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत मतदारांनी बहुतांश तरुणांना संधी दिली आहे तर प्रस्थापित वृद्धांना विश्रांती दिली आहे. यामध्ये तालुक्याचे लक्ष असलेल्या चौगानमध्ये सर्वपक्षीय पॅनलला सहा तर सत्ताधारी प्रस्थापित गटाला पाच जागा मिळाल्या आहेत. चिंचोली बूजमध्ये दोन्ही गटाला सारख्या जागा मिळाल्या तर काही ग्रामपंचायतींमध्ये काठावर बहुमत मिळाले आहे. निवडून आलेला एक सदस्य जरी फुटला तरी गावाचे राजकारण बदलणार आहे. काही गावात ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाचे चित्र अद्यापही स्पष्ट नसल्याने निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. काही ठिकाणी केवळ एका सदस्याचा फरक दोन्ही गटात आहे. त्यामुळे सरपंच पदाचे आरक्षण आपल्याकडील असलेल्या सदस्यांतील प्रवर्गातील निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवण्याची वेळ पॅनल प्रमुखांवर आली आहे. सरपंचपदाचे आरक्षण नेमके कोणते, हे अंधारात असताना निवडणुका पार पडल्या आहेत. मोठ्या खटपटीने निवडून आलेले मात्र खुर्चीवर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट नसल्याने काहीसे गोंधळून गेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी प्राप्त होत असल्याने सरपंच पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मानाची व मिळकतीच्या खूर्चीची भुरळ सर्वांनाच पडली आहे. विशेष म्हणजे ज्यांना इच्छा नसतानाही उभे करून निवडून आणले, त्यांनाही सरपंच पदाचे स्वप्न पडू लागले आहेत.
त्यामुळे निवडून येण्यात होती त्यापेक्षा अधिक उत्सुकता आता आरक्षण सोडतीकडे नवनिर्वाचित सदस्यांना लागली आहे.