गोवरी-२ खदान बंद !
By Admin | Updated: February 7, 2015 00:32 IST2015-02-07T00:32:29+5:302015-02-07T00:32:29+5:30
वेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाण चालविण्यास व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा ठपका ठेवत २०१३ मध्ये बंद करण्यात आली.

गोवरी-२ खदान बंद !
बी.यू. बोर्डेवार राजुरा
वेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाण चालविण्यास व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा ठपका ठेवत २०१३ मध्ये बंद करण्यात आली. या खाणीमध्ये मधील ३५० कर्मचाऱ्यांचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले. खाण बंद झाल्याने येथील पाच कोटींच्यावर यंत्रसामग्री सध्या धुळ खात पडली आहे. अधून-मधुन मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही.
खाण प्रशासनाने केलेल्या नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात यंत्राची चोरी होत आहे. ३० जानेवारी २०१५ ला वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाची टाटा सुमो क्रमांक एमएच ३६-४८०१ या गाडीमध्ये गोवरी-२ मधील किंमती साहित्य चोरून नेताना सास्तीच्या पोलिसांनी पकडले.या चोरीच्या मागे असलेले वेकोलिचे अधिकारी मात्र सुटले असुन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षा रक्षकाची गाडी या युवकाजवळ आली कशी, याची चौकशी करणे गरजेचे आहे. वेकोलि परिसरात अस्ताव्यस्त स्थितीत किंमती वस्तु फेकलेल्या असुन या खराब झालेल्या यंत्राची किंमत कोटींमध्ये आहे. यापूर्वी सास्तीच्या एका अधिकाऱ्यांला वाहनाचे टायर विकत असताना पकडण्यात आले होते.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमीटेड अंतर्गत सास्ती ओपनकास्टमध्ये गेटजवळच्या कचऱ्यात मागील पंधरा वर्षांपासून स्क्रॅपर मशीन पडून आहे. पाचही खाणीमधील बंदअवस्थेतील स्कॅ्रपरमशीन विक्री केल्यास कोट्यवधी रुपये वेकोलिला मिळु शकतात. मात्र याकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नाही. त्यामुळे जे मिळेत ते विकून येथील अधिकारी मोकळे होत आहे. डोजर कटर पीलर, ड्रील मशीन, डम्पर यासह अनेक यंत्र सास्ती, गोवरी परिसरात आजही पडून आहे. या नादुरुस्त यंत्रसामग्रीचे स्पेअर पार्ट काढुन विकल्या जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असली तरी वेकोलिचे अधिकारी मात्र याकडे फारशे लक्ष पुरवित नाही त्यामुळे कोटी रुपयांची यंत्र सामग्री धुळखात पडलेली आहे.