करवाढीचा मुद्दा पुन्हा आमसभेत गाजणार
By Admin | Updated: March 18, 2016 01:08 IST2016-03-18T01:08:08+5:302016-03-18T01:08:08+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली असून ही वाढ जनतेसाठी अन्यायकारक आहे.

करवाढीचा मुद्दा पुन्हा आमसभेत गाजणार
आंदोलन सुरूच : करवाढीवरून आंदोलनकर्ते आक्रमक
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली असून ही वाढ जनतेसाठी अन्यायकारक आहे. ही करवाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडी व नागरिकांचे गांधी चौकात मागील ११ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांना निवेदन देऊन चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र मालमत्ता करवाढीसंदर्भात विशेष सभा बोलावूनच चर्चा करावी, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरल्याने १८ मार्चला मनपात आमसभा होत आहे. करवाढ रद्द करण्याबाबत आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने ही आमसभा चांगलीच वादळी होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली आहे. दुसरीकडे करात वाढ केली नसल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी नागरिकांनाही चार ते पाच पट वाढलेले करपत्रक येत असल्याने नागरिकांचीही ओरड सुरू आहे. जनतेवरील हा अन्याय दूर करण्यासाठी व करवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडी व नागरिकांनी गांधी चौकात ७ मार्चपासून साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मनपाच्या स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे यांनी आंदोलनकर्त्यांना निवेदन देऊन चर्चेसाठी बोलाविले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी विशेष सभा बोलावणार असाल तरच चर्चेसाठे येऊ, असा पवित्रा घेतल्याने आंदोलन सुरूच राहिले. आज गुरुवारी गोंडराजे विरेंद्रशहरा आत्राम, रमेश काळबांधे, सचिन नवघरे, महेंद्र खनके, शेरखान समशेर खान, अमित लडके, स्वप्नील देव, सोनू चौधरी हे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, मालमत्ता करवाढीवर पुन्हा चर्चा करण्यासाठी मनपाच्या सभागृहात आमसभा बोलाविण्यात आली आहे. आंदोलनकर्ते नगरसेवक मालमत्ता करवाढीबाबत आक्रमक झाले असल्याने ही आमसभा चांगलीच वादळी होणार आहे. (शहर प्रतिनिधी)