राज्यपालांनी केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
By Admin | Updated: December 13, 2014 22:36 IST2014-12-13T22:36:28+5:302014-12-13T22:36:28+5:30
जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी

राज्यपालांनी केले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन
चंद्रपूर : जिल्हा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने चंद्रपूर शहरात लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, आमदार नाना शामकुळे, राज्यपालांचे सचिव विकास रस्तोगी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, कुलगुरु डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव व वाहतूक निरीक्षक पुंडलिक सपकाळे यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूर शहरातील वाहतूक व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या २० चौकात लोकसहभागातून ८४ सिसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. यासर्व कॅमेऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी वाहतूक शाखा आधुनिक नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियंत्रित करण्यात येत असलेल्या वाहतुकीबाबतचे सादरीकरण केले.
शहरातील गजबलेल्या सर्व चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच गुन्हेगारीला आळा बसला असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण ३५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच लोकसहभाग मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. या यंत्रणेमुळे छोट्या मोठ्या गुन्हेगारी घटनांची माहिती तात्काळ कंट्रोल रुमला होते. यावेळी काही घटनांचे चित्रीकरण कॅमेऱ्याबद्ध झाल्याचे जैन यांनी सादरीकरणातून दाखविले. यासर्व सादरीकरणाचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कौतुक केले. संचालन मेघनाथ जानी यांनी केले. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)