पारंपरिक लोककलावंतांना शासनाने मानधन द्यावे
By Admin | Updated: February 9, 2016 00:54 IST2016-02-09T00:54:45+5:302016-02-09T00:54:45+5:30
पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणजे लोककला होती. परंतु आधुनिक मनोरंजनापुढे पूर्वीच्या लोककलाकारांच्या कला लुप्त होत आहे.

पारंपरिक लोककलावंतांना शासनाने मानधन द्यावे
सभापती वैशाली येंसाबरे : लोककलाकार मेळावा
चिमूर: पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे साधन म्हणजे लोककला होती. परंतु आधुनिक मनोरंजनापुढे पूर्वीच्या लोककलाकारांच्या कला लुप्त होत आहे. शासनस्तरावर लोककलाकरांना मानधन मिळत असले तरी शेकडो कलाकार अजूनही वंचित राहत आहे. लोककलाकारांनी एकत्र येऊन कलेचा वारसा जपून ठेवावा. शासनाकडून लोककलाकारांना मानधन देण्यात यावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पंचायत समिती सभापती वैशाली येंसाबरे यांनी दिले.
शिवापूर बंदर येथे जिल्हास्तरीय लोककलाकारांचा मेळाव्यात सभापती वैशाली येंसाबरे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिक मत्ते, सरपंच बंडू ढोक, श्रीकृष्ण नन्नावरे, किरण राऊत, शाहीर परिषदेचे विदर्भ अध्यक्ष भिवगडे, जि.प. सदस्य गीता लिंगायत, डॉ. महेश जोगी (नागपूर), यशवंत घुमे, रिठे आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात जिल्ह्यातून आलेल्या लोककलाकारांची नोंदणी करुन यादी शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. खडीगंमत, पोवाडा, दंडार, भजन, तमाशा, डहाका, भारुड आदी लोककला कलाकारांनी सादर केल्या.
या मेळाव्याचे प्रास्ताविक शाहीर परिषद तालुका अध्यक्ष किरण राऊत यांनी केले. जिल्हास्तरीय लोककला मेळावा यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण नन्नावरे, नाना बारेकर, श्रीरंग गायकवाड, बंडू तराळे, ईश्वर बावणे, रामभाऊ कोडापे, दिलीप दडमल, अनिल सोनवाने, मोतीराम कामडी, नीलेश कामडी, छाया गोयकवाड, लता तराळे, पार्वता नन्नावरे, राधा सोनटक्के, सिता दडमल, गिरीजा कामडी आदींनी परिश्रम घेतले.
या मेळाव्यास लोककलाकारासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शाहीर परिषद तालुका अध्यक्ष किरण राऊत हे लोक कलाकारांच्या हितासाठी समता मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)