शासनाच्या योजना गरिबांच्या सक्षमीकरणासाठी
By Admin | Updated: August 27, 2016 00:35 IST2016-08-27T00:35:12+5:302016-08-27T00:35:12+5:30
सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे.

शासनाच्या योजना गरिबांच्या सक्षमीकरणासाठी
चंदनसिंह चंदेल: बल्लारपुरात पार पडले शिबिर
बल्लारपूर: सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र व राज्य सरकार गरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक लोकाभिमूख योजना राबवित आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न शासनस्तरावरुन केला जात आहे. समाजातील दुर्बल घटकांचे शासनाच्या योजनेच्या माध्यमातून सक्षमीकरणासाठी फायदेशीर ठरणारे आहे, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
येथील संत गाडगेबाबा वाचनालयात संत गाडगेबाबा जनसेवा संस्थेच्या वतीने स्थानिक सुभाष वॉर्डात सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची माहिती देण्याच्या अनुषंगाने बुधवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष रेणुका दुधे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूरचे तहसीलदार विकास अहीर, भाजपाच्या नगरसेवक वर्षा सुंचूवार, वैशाली जोशी, संत गाडगेबाबा महाराज जनसेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, राकेश यादव यांची उपस्थिती होती.
तहसीलदार विकास अहीर मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून शासन सामाजिक न्याय विभागाच्या योजनेची अंमलबजावणी करीत आहे. यातील संजय गांधी निराधार योजना विधवा, अपंग, दुर्धर आजाराने पीडितासाठी अन्य वंचित घटकांना आर्थिक मदत मिळून आत्मनिर्भर करण्यासाठी राबविली जाते. कुटुंब अर्थ सहाय्य योजनेच्या माध्यमातून बिपीएल प्रमाणपत्र धारक विधवांना मदत दिली जाते. सदर शिबिर लाभार्थ्यांना फायद्यासाठी असून वंचितांना यातून लाभ मिळण्यास सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन श्रीनिवास सुंचूवार यांनी तर आभार राकेश यादव यांनी मानले. प्रदीप पाठक, सुरज बहुरिया, रामजन्म चक्रवर्ती, योगेश शेट्टी, दीपक वर्मा, प्रमोद शाहू, श्रीकांत इटनकर, शितल निषाद, आशा निषाद, अजय मंगरुळकर यांनी शिबिराला सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)