जिल्हा परिषदेकडून शासनाची दिशाभूल
By Admin | Updated: September 20, 2014 23:48 IST2014-09-20T23:48:31+5:302014-09-20T23:48:31+5:30
घुग्घुस नगरपरिषद स्थापनेबाबत नगर विकास मंत्रालयाकडून दीड वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने माहिती मागितली होती. मात्र त्यावेळी माहिती दडवून ठेवण्यात आली.

जिल्हा परिषदेकडून शासनाची दिशाभूल
घुग्घुस : घुग्घुस नगरपरिषद स्थापनेबाबत नगर विकास मंत्रालयाकडून दीड वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने माहिती मागितली होती. मात्र त्यावेळी माहिती दडवून ठेवण्यात आली. घुग्घूस संघर्ष समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पाचारण करून बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. मात्र संघर्ष समितीने तो उधळून लावला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले. मात्र नवा प्रस्ताव पाठविण्याऐवजी १५ सप्टेंबरला जुनाच प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.
२००१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार घुग्घुस गावाची लोकसंख्या २९ हजार ९४५ होती, तर २०११ जनगणनेनुसार ३२ हजार ७२६ लोकसंख्या आहे. घुग्घुस गावाशी नकोडा ग्रामपंचायतीला जोडण्याची आवश्यकता नसताना व घुग्घुस ग्रामपंचायतीने १९ जानेवारी १९९९ मध्ये घुग्घुसशी या गावाला जोडू नये, असा ठराव पारित करण्यात आला असताना या ठरावाकडे दुर्लक्ष करून त्यात नकोडा गावाचा उल्लेख असलेला जुनाच प्रस्ताव १५ सप्टेंबरला नगर विकास मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पाठविला.
अप्पर सचिव नगर विकास विभाग मंंत्रालयाने २५ जानेवारी २०१२ ला जिल्हाधिकाऱ्यांना घुग्घुस नगरपरिषद स्थापना करण्यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अधिनिस्त संबंधित अधिकाऱ्यांना २७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रस्ताव देण्यात आला. १७ मार्च २०१२ ला स्वतंत्र घुग्घुस नगर परिषद हद्दीचा नकाशा तयार करण्यात आला होता. घुग्घुस गावाची २०११ च्या जनगणनेनुसार ३२ हजार ७२६ लोकसंख्या आहे. कोळसा, सिमेंट, कच्चा लोखंडाचा कारखाना, वीज प्रकल्प आहे. येथून रेल्वे वाहतूकही होते. येथे नायब तहसीलदार कार्यालय, शाळा, महाविद्यालय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्वतंत्र पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, राष्ट्रीेयकृत बँका आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ६४ स्थायी व दोन अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या नगर परिषद स्थापनेच्या निकषानुसार या गावाला बऱ्याच वर्षांपूर्वी नगर परिषदेचा दर्जा मिळावयास पाहिजे होता. मात्र राजकीय स्वार्थापोटी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे अजुनही येथे नगर परिषदेची स्थापना झाली नाही.
घुग्घुस नगरपरिषद व्हावी यासाठी नगरपरिषद स्थापना संघर्षसमितीच्यावतीने मागील महिन्यात विविध आंदोलन करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची संंयुक्त बैठक घेतली. आणि त्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारीत प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. मात्र तसे झाले नाही. (वार्ताहर)