शासकीय आरोग्य सेवा कोलमडली
By Admin | Updated: September 24, 2014 23:27 IST2014-09-24T23:27:57+5:302014-09-24T23:27:57+5:30
सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे.

शासकीय आरोग्य सेवा कोलमडली
राजुरा : सध्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच गावागावांतील अस्वच्छतेमुळे सर्वत्र डेंग्यूसदृश तापाचे थैमान पसरले आहे. आजारी रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णालये हाऊसफूल आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशा स्थितीत सामान्य नागरिक विविध समस्या व अडचणीत सापडले आहे.
सध्या मध्येच थोडाफार पाऊस पडतो आणि काही क्षणासाठी वातावरण थंड करुन जातो. त्यानंतर बेपत्ता होवून सूर्य आग ओकतो, त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढून सर्वत्र आजाराची साथ सुरु आहे. प्रत्येक गाव आजारात सापडले आहे. घरोघरी रुग्ण तडफडत आहे. सरकारी रुग्णालय फूल आहे. तसेच खाजगी दवाखाने सुद्धा हाऊस फूल झाले आहे. त्यामुळे सध्या तरी शासनाची आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ मलेरियाची टेस्ट केली जाते. परंतु रिपोर्ट दिला जात नाही. निगेटीव्ह आहे असे सांगितले जाते. डेंग्युची तपासणी होत नसल्यामुळे डेंग्यु सदृश्य ताप असलेल्या रुग्णांवर मलेरियाचे उपचार केले जात आहे. या प्रकारामुळे रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यावर ‘रेफर टू चंद्रपूर’ केले जाते. बऱ्याच वेळेस काही वैद्यकीय अधिकारी रेफर करुन घरी आराम करतात. त्यांच्या रेफर प्रकारामुळे खाजगी व बोगस डॉक्टराचे फावत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी दवाखाना उघडून रुग्णावर औषोधोपचार सुरु केले आहे. घरोघरी जावून उपचार करीत आहे. त्यांना रक्त तपासणीची गरज नाही. सखोल ज्ञान असल्याप्रमाणे रुग्णास पाहून थातूरमातूर उपचार करतात. रुग्ण बरा झाला की, विश्वास बसतो. आणि कमी खर्चात योग्य उपचार म्हणून त्यांची ख्याती होते. परंतु रुग्ण बरा झाला नाही तर त्याच्या बांधलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी पाठविले जाते. तेथे मात्र मागचे पुढेचे सर्व वसुल केले जाते. रुग्णांचा रक्त तपासणी हा एक पॅथॉलाजीचा मोठा व्यवसाय झाला आहे. शासकीय रुग्णालयातील पॅथॉलाजीच्या रिपोर्टवर रुग्णांचा विश्वास नाही. खासगी डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी आपल्या मर्जीच्या पॅथालाजी निवडल्या आहे. तेथे रुग्णास पाठविले जाते. त्यामध्ये दोघांचेही हित साधले असते. रुग्ण बरा झाल्यावर बिल पाहून नातेवाईकाचे ब्लडप्रेशर वाढत आहे. सध्या निसर्गाच्या प्रकोपामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून विविध आजाराची साथ वाढली आहे. यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
(तालुका प्रतिनिधी)