हेल्मेट घालून कार्यालयात पोहोचले शासकीय कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:07+5:302021-02-05T07:43:07+5:30
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा ...

हेल्मेट घालून कार्यालयात पोहोचले शासकीय कर्मचारी
मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा, याकरिता राज्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार कोणतेही दोनचाकी वाहन रस्त्यावर चालविताना हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे आहे, तसेच वेळोवेळी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयांनी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट घालणे हे सक्तीचे असल्याबाबत निर्णय दिलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी १ फेब्रुवारीपासून शासकीय, निमशासकीय, कार्यालय, महामंडळ महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद व सर्व शासकीय यंत्रणांमध्ये कार्यालयात येताना अथवा कोणत्याही कामासाठी दुचाकी वाहन वापरताना शासकीय कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करण्याचे आदेश दिले होते. या सुचनांचे पालन करीत अनेक शासकीय कर्मचारी हेल्मेट घालून कार्यालयात गेल्याचे दिसून आले.
बाॉक्स
आरटीओ कार्यालयात विना हेल्मेटधारकांचे समुपदेशन
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केल्यानंतर नव्याने रुजू झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांना हेल्मेटसक्ती केली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. त्यामुळे कार्यालयातील सर्व कर्मचारी हेल्मेट परिधान कररून कार्यालयात आले होते; मात्र कार्यालयीन कामाकरिता अनेक जण विना हेल्मेट आल्याने त्यांचे समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.