शासकीय कर्मचाऱ्यांनी परिवर्तनवादी चळवळ गतिमान करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:24 IST2018-03-23T23:24:18+5:302018-03-23T23:24:18+5:30
आजच्या परिस्थितीत बहुतेक लोक राजकारणापासून दूर आहेत. अशा व्यक्तींनी अराजकीय भूमिका वठवावी. तर शिक्षित कर्मचाऱ्यांनी आरामदायी जीवन सोडून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.

शासकीय कर्मचाऱ्यांनी परिवर्तनवादी चळवळ गतिमान करावी
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : आजच्या परिस्थितीत बहुतेक लोक राजकारणापासून दूर आहेत. अशा व्यक्तींनी अराजकीय भूमिका वठवावी. तर शिक्षित कर्मचाऱ्यांनी आरामदायी जीवन सोडून परिवर्तनवादी चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.
‘मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया’ या १८ मार्च १९५६ च्या डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाच्या समर्थनार्थ व कांशिराम यांच्या ८४ व्या जयंतीचे औचित्य साधून बामसेफचे संमेलन स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर येथे नुकतेच पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे राष्ट्रीय मार्गदशर्क सुरेश माने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना इ. झेड. खोब्रागडे यांनी कांशिराम यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाºयांनी निडरपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
संमेलनातील पहिल्या सत्रात ‘बहुजन समाज घटकाची राजकीय आर्थिक शैक्षणिक व शासकीय भागीदारीचे भवितव्य’ या विषयावर डॉ. विनोद शेवरीया (म.प्र) तसेच धम्मानंद मनवर नागपूर यांनी मार्गदर्शन केले. तसेच राज्य घटनात्मक लोकशाही, न्यायव्यवस्था व निवडणूक यंत्रणा यांना उद्ध्वस्त केले जात आहे काय, या विषयावर अॅड. भुपेंद्र रायपूरे, भद्रावती, नंदा फुकट नागपूर, मुंबई उच्च न्यायालयाच्या अॅड. फिरदोस मिर्झा यांनी हुकूमशाहीच्या आधारावर न्याय व्यवस्था, निवडणूक यंत्रणा व घटनात्मक लोकशाही कशी उद्ध्वस्त केली जात आहे, यावरच विचार मांडले. यावेळी बामसेफच्या वतीने अॅड. डॉ. सुरेश माने, दशरथ मडावी यांना एक लाख ६० हजार रुपये चळवळ निधी सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विदर्भ प्रदेश समन्वयक इंजि. विजय दुपारे यांनी तर आभार डी. यू. केळझरे यांनी मानले.