शासकीय कर्मचारी रस्त्यावर
By Admin | Updated: September 3, 2016 00:30 IST2016-09-03T00:30:34+5:302016-09-03T00:30:34+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले.

शासकीय कर्मचारी रस्त्यावर
शासकीय कार्यालये, बँका बंद : मोर्चात शेकडो कर्मचारी सहभागी
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविले. त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष लोटली. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. शासनाच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी व आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक संप पुकारला. त्यानंतर मोर्चा काढून शासकीय धोरणाचा निषेध केला.
या मोर्चाला अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, वीज निर्मिती कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती, सेंटर आॅफ इंडीयन ट्रेड युनीयन (सिटू), कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी समिती संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी आरोग्य कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राष्ट्रीयकृत बँका व वेकोलिच्या कर्मचाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होत आपला रोष व्यक्त केला. आज शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील गांधी चौकातून विविध कर्मचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एकापाठोपाठ एक कर्मचारी संघटना मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या व सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. सदर मोर्चाला समर्थन देण्यासाठी कामगार नेते व माजी खासदार नरेश पुगलियादेखील काही अंतरापर्यंत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अमृत मेश्राम, महासचिव विश्वनाथ आसई, अशोक वडनेकर, मोहम्मद ताजुद्दीन, बबनराव पवार, अतिन घोष, किशोर बाराहाते, सुरेश पाटील, देवनाथ वासुर्के, विठ्ठल नगराळे, चंदा मेंढे, मधुकर भरने, वामन बुटले, निता घोष, भिमप्रकाश उराडे यांच्यासह विविध कार्यालयातील शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनीही तगडा बंदोबस्त ठेवला होता. (शहर प्रतिनिधी)
बंदमुळे नागरिकांची गैरसोय
शासकीय कर्मचाऱ्यांच्या या लाक्षणिक संपामुळे आज अनेक कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला. आरोग्य कर्मचारीही या संपात सहभागी असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली. बँक कर्मचारीही संपावर असल्याने बँकेतील कोट्यवधींचा व्यवहार आज ठप्प होता. अशातच अनेक एटीएम केंद्रातही पैसे नसल्याने ऐन पोळा सणाच्या दिवशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.