जनतेच्या आर्थिक उत्थानासाठी सरकार कटीबद्ध
By Admin | Updated: August 22, 2016 01:54 IST2016-08-22T01:54:59+5:302016-08-22T01:54:59+5:30
विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान

जनतेच्या आर्थिक उत्थानासाठी सरकार कटीबद्ध
हंसराज अहीर : ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष; शहिदांचे स्मरण’ कार्यक्रम
भद्रावती : विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून जनतेची आर्थिक संपन्नता साध्य आणि त्यांचा आर्थिक उत्थान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून जनतेनेसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
सांसद आदर्श ग्राम असलेल्या चंदनखेडा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने कर्मवीर विद्यालयात आयोजित ‘स्वातंत्र्याची ७० वर्ष - शहीदांचे स्मरण’ या विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह, माजी आमदर संजय देवतळे, भद्रावती पंचायत समितीच्या सभापती इंदु नन्नावरे, क्षेत्रीय प्रचार कार्यालय नागपूरचे क्षेत्रीच प्रचार अधिकारी मनोज सोनोने, चंदनखेडाच्या सरपंच गायत्री डेविस बागेसरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, शेतकऱ्यांना केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीला पुरक असलेल्या जोडधंद्यांकडे वळण्याची गरज असून मुद्रा योजनेअंतर्गत रेशिम उद्योग, मधमाशी पालन, दुध डेरी यासारख्या पुरक व्यवसायाचा स्वीकार केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असा आत्मविश्वास अहीर यांनी व्यक्त केला.
बँकांनी मागेल त्याला कर्ज देण्याचे प्रयत्न करावे, असे सांगून ना. हंसराज अहीर म्हणाले की, सरकार विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु सरकारच्या सोबतच आर्थिक उत्थानाची जबाबदारी लोकांचीसुद्धा असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राच्या चोरा शाखेच्या वतीने गजानन ठाकरे या लाभार्थ्यास पुनर्गठीत पीक कर्ज या योजनेतून अडीच लाख तसेच दिनेश निमजे यांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून नव्वद हजाराचे अर्थ साहित्याचे केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंह हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, स्वातंत्रविरांच्या बलिदानातून आपणास स्वतंत्र प्राप्त झाले. छत्रपती शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून एक आदर्श ग्राम बनविण्याचा संकल्प याप्रसंगी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी माजी मंत्री संजय देवतळे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी केले.
यावेळी बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक संजय हिरेमठ यांनी मुद्रा योजना, अटल पेंशन योजना याची उपस्थितांना माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी बी.सी. राजवाडे यांनी पीक विमा योजना, चंद्रपूर येथील आयटीआयचे प्राचार्य नितीन जुनोनकर यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही.व्ही. मुंजनकर यांनी आरोग्याच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूरचे क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे बी.पी. रामटेके, आर.एम. सोनसळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)