गोवरी, पवनी, सास्ती खाण परिसर प्रदुषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: February 7, 2015 23:21 IST2015-02-07T23:21:47+5:302015-02-07T23:21:47+5:30
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत या परिसरात पाच खाणी सुरू आहे. त्यातील एक खदान बंद पडली. पवनी, गोवरी, सास्ती ओपनकास्ट, सास्ती भूमिगत, गोवरी डिप या पाच खाणीमध्ये

गोवरी, पवनी, सास्ती खाण परिसर प्रदुषणाच्या विळख्यात
बी.यू. बोर्डेवार - राजुरा
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत या परिसरात पाच खाणी सुरू आहे. त्यातील एक खदान बंद पडली. पवनी, गोवरी, सास्ती ओपनकास्ट, सास्ती भूमिगत, गोवरी डिप या पाच खाणीमध्ये वेकोलि कर्मचारी कार्यरत असुन सास्तीसह अन्य खाणीमध्ये तथा परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे.
सास्ती खुल्या खदाणीमध्ये जिकडे तिकडे धुळ पसरलेली आहे. तसेच सास्ती सीएचपीकडून येणाऱ्या ट्रकांमुळे प्रचंड प्रमाणात धुळप्रदूषण होत असल्याने येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणाहुन ट्रका जातात त्या रस्त्यावर पाणी टाकणे अत्यंत आवश्यक आहे परंतु असे होत नाही. कर्मचारी या प्रदूषणामध्येच जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.
वेकोलि क्षेत्र पूर्णपणे प्रदुषणाच्या विळख्यात असताना केवळ अधिकाऱ्यांना प्रदूषण भत्ता दिला जातो. मात्र जे कर्मचारी प्रत्यक्षात प्रदुषणाच्या ठिकाणी काम करतात त्यांना मात्र या पासून वंचित रहावे लागत आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत गोवरी कॉलरी मधील ४२४ परिवार जिर्ण अवस्थेमध्ये असलेल्या वेकोलि क्वार्टरमध्ये राहतात. त्यामुळे केव्हाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात तर या वसाहतीतील परिस्थिती विदारक असते.निकृष्ठ बांधकाम केल्यामुळे या क्वॉर्टरचे तिनतेरा वाजले आहे.
प्रदुषणावर आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ असस्तित्वात आहे. परंतु जेव्हा वेकोलिमध्ये प्रदुषण मंडळाचे अधिकारी येतात तेव्हा सर्व काही ठिक असल्याचे चित्र वेकोलिकडून तयार केले जाते. अधिकारी गेले की पुन्हा जैसे थे स्थिती होते. प्रदूषणामुळे अनेक कर्मचाऱ्यांना गंभीर आजाराला समोर जावे लागत आहे. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. वेकोलिच्या खाणीमुळे आणि कोलवाशरीजमुळे परिसरातील शेतीवरही परिणाम पडला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. नुकसान होत असतानाही त्यांना कोणतीही मदत देण्यात येत नाही. त्यामुळे प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी केली जात आहे.